येमेन नागरिकांना लुटणारी दिल्लीची इराणी टोळी जेरबंद; ६०० पेक्षा अधिक CCTV तपासून लावला छडा

By नितीश गोवंडे | Published: February 28, 2024 06:23 PM2024-02-28T18:23:48+5:302024-02-28T18:24:54+5:30

पोलिसांनी विविध ठिकाणचे तब्बल ६०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासून पुणे ते दमण असा प्रवास करून आरोपींना बेड्या ठोकल्या

Delhi-based Iranian gang jailed for robbing Yemeni citizens Check more than 600 CCTVs | येमेन नागरिकांना लुटणारी दिल्लीची इराणी टोळी जेरबंद; ६०० पेक्षा अधिक CCTV तपासून लावला छडा

येमेन नागरिकांना लुटणारी दिल्लीची इराणी टोळी जेरबंद; ६०० पेक्षा अधिक CCTV तपासून लावला छडा

पुणे : वैद्यकीय उपचारासाठी पुण्यात आलेल्या येमेनच्या नागरिकांना लुटणार्‍या दिल्ली येथील इराणी टोळीला कोंढवा पोलिसांनी दमण येथील एका हॉटेलमधून बेड्या ठोकल्या. अरबी भाषेत संवाद साधून पोलिस असल्याची बतावणी करत ही टोळी येमेन च्या नागरिकांना लुटत होती.

सिकंदर अली शेख (४४), करीम फिरोज खान (२९), इरफान हुसेन हाशमी (४४), मेहबुब अब्दुल हमदी खान (५९, सर्व रा. दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी ३ हजार अमेरिकी डॉलर, ५०० सौदी रियाल, ५३ हजारांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली दोन लाख रुपये किमतीची कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

येमेन देशाचे नागरिक उपचारासाठी पुण्यात आल्यानंतर ते कोंढवा परिसरात वास्तव्यास असतात. त्यांना भारतीय भाषा येत नाही. तसेच त्यांचा पेहराव देखील वेगळा असतो, त्यामुळे ते इतरांच्या नजरेत येतात. सालेह ओथमान एहमद (५२) हे त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी पुण्यात आले होते. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी येथील आशीर्वाद चौकातून पायी चालत जात असताना, चौघा आरोपींनी त्यांना पोलिस असल्याची बतावणी करत लुटले होते. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना, सहायक पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, अंमलदार सुहास मोरे आणि राहुल थोरात यांच्या पथकांना आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडीचे फुटेज मिळाले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींच्या गाडीचा दमणपर्यंत माग काढून आरोपींना बेड्या ठोकल्या. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त आर. राजा, सहायक पोलिस आयुक्त गणेश पिंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे, गुन्हे निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, कर्मचारी अमोल हिरवे, जयदेव भोसले, राहुल थोरात, सुहास मोरे, अभिजीत रत्नपारखी, अभिजित जाधव, शशांक खाडे, विकास मरगळे, रोहित पाटील यांच्या पथकाने केली.

साडेदहा तास, ६०० सीसीटीव्ही अन् ३५० किलोमीटर प्रवास...

कोंढवा पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून ही टोळी जेरबंद केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा माग काढण्यास सुरूवात केली. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यावेळी गुन्ह्यात वापरलेली कार उर्से टोलनाका येथून पास होऊन चारोटी टोल नाका-डाहाणू-घोलवाड-गुजरातच्या हद्दीतून केंद्र शासीत प्रदेश दमण येथील देवका बीच वरील एका हॉटेलमध्ये पहाटे तीन वाजता पोहोचल्याचे समोर आले. हॉटेलमध्ये दिलेल्या ओळखपत्राद्वारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुन्हा घडल्यापासून साडे दहा तासांचा कालावधी लोटला होता. या वेळात पोलिसांनी विविध ठिकाणचे तब्बल ६०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले. पुणे ते दमण असा साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.

अटक करण्यात आलेले आरोपी दिल्ली येथील इराणी टोळीतील आहेत. त्यांनी यापूर्वी देखील शहरात येऊन येमेन नागरिकांना पोलिस असल्याची बतावणी करून लुटले आहे. त्यानंतर त्यांनी ८ फेब्रुवारी रोजी शहरात गुन्हे केले. बातमीदारामार्फत मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे माग काढून आरोपींना दमण येथून अटक केली आहे. - संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस ठाणे

Web Title: Delhi-based Iranian gang jailed for robbing Yemeni citizens Check more than 600 CCTVs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.