तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 10:48 IST2025-04-08T10:45:15+5:302025-04-08T10:48:22+5:30
वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास नातेवाइकांनी १८००२३३४१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी

तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस
पुणे : तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना अनामत रक्कम भरण्याची सक्ती करू नका, अशा स्वरूपाची नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना काढली आहे. अनामत रकमेसाठी अडवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशारादेखील आरोग्य विभागाने दिला आहे.
दहा लाखांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेवर उपचार नाकारले. त्यानंतर उशिरा उपचार मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. पैशांमुळे रुग्णाचा जीव गेल्यामुळे रुग्णालयाविरोधात चांगलेच वातावरण पेटले आहे. राजकीय पक्षांकडून तसेच सामाजिक संघटना, संस्था, पुणेकरांकडून रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व ८६० खासगी रुग्णालयांना तातडीच्या उपचारासाठी अनामत रकमेचा हट्ट धरू नये. अशा प्रकारची नोटीस दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली आहे. रुग्णालयांनी महापालिकेच्या आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
या टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार
रुग्णालयांनी अनामत रक्कम भरण्याची सक्ती केल्यास किंवा वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास नातेवाइकांनी १८००२३३४१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
८९ रुग्णालयांवर आरोग्य विभागाने केली कारवाई
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशानुसार, शहरातील रुग्णालयांची तपासणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केली आहे. त्यानुसार शहरातील ८६० रुग्णालयांची तपासणी केली. या तपासणीत दर्जेदार सेवा, रुग्णांना सेवा मिळण्यास काही अडचणी आहेत का? या पाहणीसह रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक लावणे, टोल फ्री क्रमांक लावला आहे का? याची तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेदरम्यान ८९ रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळून आल्याने या प्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांना नोटीस दिली आहे.