आळंदी, देहू पालखी सोहळयाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 15:06 IST2020-05-12T15:06:05+5:302020-05-12T15:06:43+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद..

Decision regarding Alandi, Dehu Palkhi ceremony in next two days: Collector Naval Kishore Ram | आळंदी, देहू पालखी सोहळयाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

आळंदी, देहू पालखी सोहळयाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

ठळक मुद्देशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवणार

पुणे : आळंदीदेहू पालखी सोहळयाचे नियोजन, तसेच स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.१२) जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे, संजय मोरे आदी उपस्थित होते.
        जिल्हाधिकारी राम म्हणाले, वारकरी संप्रदायाची परंपरा असणाऱ्या ऐतिहासिक अशा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार टाळेबंदीचे स्वरूप पाहता आळंदी ते पंढरपूर असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखीसोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
  फिजिकल डिस्टसिंगबाबत शासनाची नियमावली, टाळेबंदीची परिस्थिती व येत्या काळातील संभाव्य चित्र, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळयाचे स्वरूप नेमके कसे असावे व त्याचे नियोजन कशाप्रकारे करावे याबाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल. शासनाने दिलेल्या सूचनांचे अत्यंत काटेकोर पालन करून आम्ही कमी संख्येत पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवणार असल्याचे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी सांगितले.
           देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे म्हणाले, आषाढी वारीची परंपरा अबाधित रहावी यासाठी तसेच या सोहळयासाठी गरजेच्या आवश्यक त्याच सुविधा शासनाकडून अपेक्षित आहेत, आम्ही समाजाची काळजी घेत तसेच शासनाचा नियमावलीचे पालन करून या पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
                   या बैठकीमध्ये पालखी सोहळयाचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी संख्या तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: Decision regarding Alandi, Dehu Palkhi ceremony in next two days: Collector Naval Kishore Ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.