पुणे : पुण्याच्या धायरी भागात दिवसाढवळ्या दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चक्क दुकानात शिरून आरोपींनी धमकी देत २५ ते ३० तोळे दागिने हिसकावले आहेत. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धायरी येथील काळुबाई चौक, रायकर मळा येथे श्री सराफ दुकानात दुकान मालक विष्णू सखाराम दहिवाल आणि कामगार दुकानात असताना एक व्यक्ती दुकानात आला . सोन्याची चैन दाखवा असे सांगून मालक सोन्याची चैन दाखवत असताना अजून दोन अनोळखी व्यक्ती एकापाठोपाठ दुकानात शिरले. त्यांनी खेळण्यातले पिस्तूल दाखवून आणि धमकी देऊन शिवीगाळी करत अंदाजे 25 ते 30 तोळे सोन्याचे वेगवेगळे दागिने हिसकावले. दरम्यान दुकान मालकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना हाताने मारहाण करून, पिस्टलचे बॅटने मारहाण करून दुचाकीवरून फरार झाले.