दौंडच्या कला केंद्रात गोळीबार ? पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:35 IST2025-07-23T18:32:46+5:302025-07-23T18:35:47+5:30
लावणी की डीजे गाणी वाजवायची यावरून दोन गटांत वाद झाला आणि त्यातून गोळीबार झाल्याची चर्चा आहे.

दौंडच्या कला केंद्रात गोळीबार ? पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं
पुणे - दौंड तालुक्यातील न्यू अंबिका कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा सोमवारी रात्रीपासून सुरू आहे. मात्र, २४ तास उलटूनही पोलिसांकडून या प्रकरणाची स्पष्ट माहिती मिळालेली नाही. स्थानिकांनुसार, लावणी की डीजे गाणी वाजवायची यावरून दोन गटांत वाद झाला आणि त्यातून गोळीबार झाल्याची चर्चा आहे.
अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले की, “सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या संदर्भात पुढील चौकशी सुरू आहे.” पत्रकारांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आहे का, असा प्रश्न विचारला असता पोलिसांनी त्यास नकार दिला.
स्थानिकांनी आरोप केला आहे की, या प्रकरणातील संबंधित व्यक्ती एका आमदाराशी जवळीक असल्यामुळे गोळीबाराचे प्रकरण दडपले जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केल्याचे सांगितले असले तरी, गोळीबार झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
न्यू अंबिका कलाकेंद्राच्या मालकांनीही गोळीबाराचा निषेध करत, “आमच्या ठिकाणी अशी कोणतीही घटना घडलेली नाही. पोलिसांनी चौकशी करून सत्य बाहेर आणावे. जर गोळीबार आढळला तर कायदेशीर कारवाई करावी,” असे मत व्यक्त केले.