पुण्यातील एनसीसी मुख्यालयात प्रशिक्षणाच्या अद्ययावत सुविधा उभारणार; हेडक्वाटर प्रमुख ब्रिगेडिअर आर. के. गायकवाड यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 12:11 IST2021-09-06T12:11:38+5:302021-09-06T12:11:44+5:30
ब्रिगेडिअर आर. के. गायकवाड : हेडक्वाॅटर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

पुण्यातील एनसीसी मुख्यालयात प्रशिक्षणाच्या अद्ययावत सुविधा उभारणार; हेडक्वाटर प्रमुख ब्रिगेडिअर आर. के. गायकवाड यांची माहिती
पुणे : राष्ट्रीय छात्र सेनेतून लष्करात जाण्याचे प्रारंभिक प्रशिक्षण मिळते. यासोबतच विद्यार्थ्यांना अनुशासन आणि एकतेचे धडे मिळतात. पुण्यातील एनसीसी मुख्यालयात अनेक आधुनिक सुविधा निर्माण करण्याचा हेतू असून, याद्वारे पुण्यात एनसीसी नगर बनिवण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने आराखडा निर्माण करणार असल्याची माहिती एनसीसी हेडक्वाटर प्रमुख ब्रिगेडिअर आर. के. गायकवाड यांनी दिली.
पुणे एनसीसी ग्रुप हेडक्वाॅटरचे प्रमुख म्हणून ब्रिगेडिअर आर. के. गायकवाड यांनी पदभार स्वीकारला. या वेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. गायकवाड म्हणाले की, एनसीसीच्या माध्यमातून अनेक मुले आज लष्करात दाखल होत आहे. ही चांगली बाब आहे. ही संख्या वाढावी, यासाठी मुख्यालयातून जास्तीत जास्त सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. गुजरातमध्ये एनसीसी नगर ही संकल्पना राबविण्यात आली आहे. त्याद्वारे अनेक आधुनिक सुविधा छात्रांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या साधनांच्या माध्यमातून छात्रांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. लष्करात दाखल होताना या सुविधांचा फायदा मुलांना होतो. त्याच धरतीवर पुण्याच्या एनसीसी मुख्यालयात सुविधा निर्माण करण्याचा मानस असल्याचे गायकवाड म्हणाले.
सध्या एनसीसी मुख्यालयात फायरिंग सुविधा निर्माण केली जात आहे. यास साडेपाच कोटींचा निधी मिळणार आहे. काही दिवसांत लवकरच या कामाला सुरूवात होईल. राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त निवड व्हावी, या हेतून सुविधा निर्माण केल्या जात आहे. एनडीए, आयएमएमध्ये जाण्यासाठी विषेश प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. त्याद्वारे त्यांना या परीक्षासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. पुणे मुख्यालयात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारून त्यांना प्रशिक्षित करण्याचा मानस असल्याचे गायकवाड म्हणाले.