'दगडूशेठ' गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:42 IST2025-05-31T13:40:53+5:302025-05-31T13:42:23+5:30

भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर आहे

'Dagadusheth' Ganesha will be installed in the Sri Padmanabha Swamy Temple in Kerala this year | 'दगडूशेठ' गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार विराजमान

'दगडूशेठ' गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार विराजमान

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने १३३ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळ मधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे १०८ दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवासस्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार असून भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.
 
गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यंदा ज्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे, ते मंदिर केरळ शैली आणि द्रविड शैलीच्या वास्तुकलेचे गुंतागुंतीचे मिश्रण करून बांधले गेले आहे. पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत ५ थरांचा गोपुर असणार आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात येणार आहेत. तर, गाभा-यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती असतील. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात येणार आहे. नानाविध वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी असेल. 

पद्मनाभ स्वामी हे अनंतशयन मुद्रेत विराजमान असे भगवान विष्णूंचे एका रूप आहेत. जे शेष नावाच्या त्यांच्या नाग पर्वतावर शाश्वत योगिक निद्रेमध्ये गुंतलेले आहे. पद्मनाभस्वामी हे त्रावणकोर राजघराण्याचे पालक देवता देखील आहेत. याच पद्मनाभ स्वामी मंदिराची रचना अत्यंत विलोभनीय असून मुख्य तीर्थक्षेत्र म्हणून याची सर्वदूर ख्याती आहे. मंदिराच्या गर्भगृहात पद्मनाभ सर्प अनंत किंवा आदिशेषावर बसलेला आढळतो. या सर्पाचे पाच फणे हे आतील बाजूला तोंड करून आहेत, जे चिंतन दर्शवितात. पद्मनाभ स्वामींचा उजवा हात शिवलिंगावर ठेवला आहे. समृद्धीची देवी श्रीदेवी - लक्ष्मी आणि विष्णूंच्या पत्नी पृथ्वीची देवी भूदेवी त्याच्या बाजूला आहेत. ब्रह्मा हे या देवतेच्या नाभीतून बाहेर पडणा-या कमळावर अवतरतात. 

 

Web Title: 'Dagadusheth' Ganesha will be installed in the Sri Padmanabha Swamy Temple in Kerala this year