पुणे : शेवटपर्यंत अतितटीने झालेल्या सामन्यात दबंग दिल्लीने जयपूर संघाला ३३-३१ असे हरविले आणि प्रो कबड्डी लीगमध्ये रोमहर्षक विजय नोंदविला. मध्यंतराला दिल्लीकडे नऊ गुणांची आघाडी होती.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत दिल्ली व जयपूर या दोन्ही संघांनी यापूर्वीच प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. मात्र साखळी गटात अव्वल स्थान मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांमध्ये चुरस होती. दिल्ली संघाने गेल्या तेरा सामन्यांमध्ये विजय मिळवत अपराजित्व कायम ठेवले होते. आजही ही मालिका अखंडित ठेवण्यासाठी ते अव्वल दर्जाचा खेळ करतील अशी अपेक्षा होती. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दिल्ली संघाने आघाडी घेऊन ती कायम ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. पंधराव्या मिनिटाला त्यांच्याकडे १७-१२ अशी आघाडी होती. त्यांचा चढाईपटू आशु मलिक याने या स्पर्धेच्या इतिहासातील सातशे गुणांचा टप्पा ओलांडला. मध्यंतराला दिल्ली संघाने २१-१२ अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धातही दिल्ली संघाने आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या २५ व्या मिनिटाला त्यांच्याकडे सहा गुणांची आघाडी होती. शेवटची दहा मिनिटे बाकी असताना त्यांच्याकडे पाच गुणांचे अधिक्य होते. जयपूरच्या खेळाडूंनी जिद्दीने लढत देत ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. सहा मिनिटे बाकी असताना लोण नोंदवण्याची जयपूरला संधी मिळाली. त्याचा फायदा घेत त्यांनी लोण नोंदवीत २७-२७ अशी बरोबरी साधली. या बरोबरीमुळे सामन्यातील उत्सुकता वाढली. दिल्ली संघाकडून कर्णधार अशू मलिक व नवीन कुमार यांनी सुरेख चढाया केल्या जयपुर संघाकडून अर्जुन देशवाल व अभिजीत मलिक यांनी पल्लेदार चढाया केल्या.