पुण्यात सायबर चोरांचा सुळसुळाट; चौघांना ४२ लाखांचा गंडा
By नितीश गोवंडे | Updated: December 20, 2024 18:52 IST2024-12-20T18:52:08+5:302024-12-20T18:52:48+5:30
मागील काही दिवसापासून शहरात सायबर चोरट्यांनी नागरिकांना आपल्या जाळ्यात खेचून कोट्यावधींची आर्थिक फसवणूक केली आहे

पुण्यात सायबर चोरांचा सुळसुळाट; चौघांना ४२ लाखांचा गंडा
पुणे : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी चौघांना ४२ लाख ६१ हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसापासून शहरात सायबर चोरट्यांनी नागरिकांना आपल्या जाळ्यात खेचून कोट्यावधींची आर्थिक फसवणूक केली आहे. नागरिक देखील प्रलोभनाला बळी पडून आपली जमा-पुंजी त्यांच्या हवाली करत आहेत. सायबर चोरट्यांच्या फसवणूक सापळ्यात शेअर मार्केट गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे प्रलोभन प्रसिद्ध आहे.
कोथरूड येथील ५८ वर्षीय व्यक्तीला सायबर ठगांनी १८ लाखाचा गंडा घातला आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यावर त्यांना चांगला परतावा देण्याचे बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत पौड रोड कोथरूड येथील ४३ वर्षीय महिलेची देखील अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली आहे. महिलेला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत १० लाख १५ हजार रुपये घेतले. मात्र त्यानंतर महिलेला न गुंतवणूक केलेले पैसे परत केले न नफा मिळाला. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या घटनेत टिंगरे नगर येथील ५४ वर्षीय व्यक्तीची शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आमिषाने ९ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत संबंधित व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार विश्रांतवाडी पोलिसांनी सायबर ठगाच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चौथ्या प्रकरणात वडगावशेरी येथील २७ वर्षीय व्यक्तीला ट्रेडिंगचे वेगवेगळे टास्क देऊन ४ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सायबर ठगांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.