पुणे: दौंड तालुक्यातील यवत येथे शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) रोजी उसळलेल्या दंगलीनंतर गावात कडकडीत जमावबंदी लागू करण्यात आली होती. सलग ५ दिवसानंतर सकाळी ६ वाजेपासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार या वेळेत सर्व काही सुरु आहे. पोलिसांकडून अत्यंत सतर्कतेने परिस्थितीवर अजूनही लक्ष ठेवण्यात येत आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ नुसार यवत येथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. आता पुढील आदेश होईपर्यंत सकाळी ६ वाजेपासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत जमावबंदी शिथिल करून त्यानंतर जमावबंदी लागू करण्यात येत आहे. या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
यवत पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस दलाची तैनाती करण्यात आली असून गावाच्या प्रमुख चौकांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस तपासात आतापर्यंत ९२ संशयित आरोपींची नावे FIR मध्ये नोंदवण्यात आली आहेत. तसेच ५०० ते ६०० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी अद्यापपर्यंत १५ जणांना अटक केली आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सध्या गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व स्तरांवर सतर्कता बाळगली जात आहे. दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.