हडपसरमध्ये सात दारुच्या दुकान मालकांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 19:01 IST2020-05-05T18:52:49+5:302020-05-05T19:01:15+5:30
दारूसाठी शहरात गर्दीचा महापूर आल्याचे चित्र

हडपसरमध्ये सात दारुच्या दुकान मालकांवर गुन्हे दाखल
पुणे : राज्य सरकारने ३ मे नंतर लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला असला तरी दारूची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे तसेच पिंपरी शहरातील दारूच्या दुकानांबाहेर सोमवारी आणि मंगळवारी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावत मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले आहे. या दुकानाबाहेर जमलेल्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टंसिन्गचा पुरता फज्जा उडाला. तसेच दारूसाठी शहरात गर्दीचा महापूर आल्याचे चित्र होते.
दारू विक्रीसाठी परवानगी देताना दिलेल्या अटींचे पालन न केल्याने व हडपसरमधील ७ वाईन शॉप मालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये रोहित वाईन्स, शनि मंदिराजवळ, हडपसर, एम आर वाईन्स, ससाणेनगर, एशियनवाईन्स, आकाशवाणी, एस एस घुले वाईन्स, रासकर चौक, अजंठा वाईन्स, गाडीतळ,राजधानी वाईन्स आणि कुणाल वाईन्स या वाईन शॉपच्या मालकांवर हडपसर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
दारू विक्रीसाठी परवानगी देताना फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे व प्रत्येक ग्राहकाचे थर्मल स्क्रीनिंग केल्यावरच त्याला दारु विक्री करण्याचे तसेच मास्क न घालणाऱ्यांना विक्री न करण्याचे बंधन घालण्यात आले होते. या दुकानदारांनी कोणत्या ग्राहकात फिजिकल डिस्टन्सिंगचा व थर्म स्क्रीनिंगचा वापर न करता मास्कचा वापर न करता लोकांची गर्दी जमविली. त्यामुळे शासकीय आदेशाचा व मार्गदर्शक तत्त्वांचा भंग करुन कोरोना संसर्ग पसरविण्याची कृती केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.