पुणे : वाघोलीत एका शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथके रवाना झाली. याबाबत निलेश सुभाष सातव (३३, रा. वडजाई वस्ती, डोमखेलआव्हाळवाडी रस्ता, वाघोली) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अधिक माहितीनुसार, निलेश सातव हे शेतकरी आहेत. त्यांचा बंगला वडजाई वस्ती परिसरात आहे. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास सातव यांच्या बंगल्याच्या खिडकीवर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात खिडकीच्या काचा फुटल्या. गाढ झोपेत असलेले सातव कुटुंबीय गोळीबाराच्या आवाजामुळे जागे झाले. त्यांनी पाहणी केली. तेव्हा खिडकीच्या काचा फुटल्याचे लक्षात आले. तेव्हा घरात दोन पुंगळ्या सापडल्या. सातव यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, वाघोली ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पुंगळ्या जप्त केल्या आहेत. सातव यांच्या बंगल्याच्या खिडकीतून दोन गोळ्या झाडल्याचे उघडकीस आले आहे.सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर सातव यांची चौकशी करण्यात आली. सातव यांचा कोणाशी वाद नव्हता. गोळीबारामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पसार झालेल्या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सहा पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक विनायक अहिरे करत आहेत.
CRIME NEWS : वाघोलीत शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 16:31 IST