अपहरण करून रोकड लुटल्याप्रकरणी माजी स्थायी समिती अध्यक्षाच्या मुलासह चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 19:58 IST2019-05-31T19:54:16+5:302019-05-31T19:58:23+5:30
हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करीत त्यांना मारहाण करून लुटल्याप्रकरणी पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्षांच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरण करून रोकड लुटल्याप्रकरणी माजी स्थायी समिती अध्यक्षाच्या मुलासह चौघांवर गुन्हा
पिंपरी : हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करीत त्यांना मारहाण करून लुटल्याप्रकरणी पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्षांच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास बाणेर येथे घडली. फुआराम रामाजी देवासी (वय ३१, रा. मीरा सोसायटी, पेरीविंकल स्कूलजवळ, बावधन खुर्द, मूळ रा. राजस्थान) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार समीर चांदेरे, गणेश इंगवले आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवासी व त्यांचे भाऊ अमीरा रामाजी देवासी, कान्हाराम मोडाजी देवासी हे गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास बाणेर येथील मुंबई-बेंगलोर हायवेवरील नेक्सा शोरुमशेजारी असलेल्या त्यांच्या आशापुरी हॉटेलवर होते. त्या वेळी गणेश इंगवले व त्याच्यासोबत एक जण मोटारीतून त्याठिकाणी आले. इंगवले याने फिर्यादीला मोटारीजवळ बोलावून घेत ‘हॉटेल तू चालवत आहे काय?’ असे विचारून त्यांना मोटारीत बसण्यास सांगितले. यास फिर्यादी यांनी नकार दिला असता त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसवून हायवेच्या पलीकडे घेऊन गेले. त्या वेळी गणेश इंगवले मोटार चालवित होता तर इतर त्यांना मारहाण करीत होते.
फुआराम देवासी यांना वीरभद्रनगर बाणेर येथील कंपाउंड असलेल्या मोकळया प्लॉटमध्ये नेले. त्याठिकाणी समीर चांदेरे व आणखी एक अनोळखी व्यक्ती होता. चांदेरे फिर्यादीला म्हणाला की, ‘तू हॉटेल कोणाला विचारून चालविण्यास घेतले आहे. तू हॉटेल ज्या जागेत चालवित आहेस ती जागा माझी आहे, तू दोन तासांचे आत हॉटेल बंद कर नाही तर तुला मारून टाकीन’ तसेच गणेश इंगवले सह इतर आरोपींनी देवासी यांना हाताने मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, फिर्यादी यांच्या खिशामध्ये हॉटेल व्यवसायाचे असलेले पैसे आरोपी काढून घेत असताना देवासी यांनी त्यास विरोध केला असता समीर चांदेरे व इतर दोघांनी देवासी यांना पकडले. तर गणेश इंगवले याने देवासी यांच्या खिशात असलेली १ लाखांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर हॉटेल लगेच बंद झाले पाहिजे असे म्हणत आरोपी देवासी यांना आणखीन मारहान करू लागल्याने देवासी यांनी त्यांच्या तावडीतून निसटून हॉटेलकडे आले. समीर चांदेरे हा पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांचा मुलगा आहे.