चार तासांच्या अथक प्रयत्नांमुळे गाईला जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 00:28 IST2019-01-10T00:28:29+5:302019-01-10T00:28:51+5:30
शिरूरमधील घटना : प्लॅस्टिकमध्ये बांधलेले अन्नखाणे जिवावर बेतले, मोकाट गार्इंची कोण घेणार काळजी ?

चार तासांच्या अथक प्रयत्नांमुळे गाईला जीवदान
शिरूर : प्लॅस्टिकमध्ये बांधलेले अन्न प्लॅस्टिकसह खाणे गाय-बैल; तसेच गाढवांच्या जिवावर बेतत असल्याचे चित्र आहे. आज एका गाईला याचमुळे मृत्यूशी झुंजावे लागले; मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चार तासांच्या अथक प्रयत्नांमुळे गाईला जीवदान मिळाले. अनेक भटक्या जनावरांचा प्लॅस्टिकमुळे मृत्यू झाल्याचा दावा पशुधन पर्यवेक्षक, तसेच व्हेटरनरी डॉक्टरांनी केला आहे.
आज शहरात रेव्हेन्यू वसाहत परिसरात एक गाय तडफडत असल्याचे आढळून आले. या वेळी विशाल धायतडक, प्रीतेश गादीया, मनोज तातेड, मयूर थोरात यांनी गाईला पाणी पाजले; तसेच पशुवैद्यकीय अधिकाºयास संपर्क साधला. यावर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी गोरख सातकर, पशुधन पर्यवेक्षक शेखर मंदीलकर, डॉ. नितीन कारखिले यांनी गाईवर उपचार करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गाईने प्लॅस्टिक खाल्ले असल्याने जगण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरात प्रत्येक भागात घंटागाडीद्वारे कचरा उचलला जातो. मात्र, अनेक नागरिक हे निष्काळजीपणे शिल्लक राहिलेले अन्न प्लॅस्टिकमध्ये बांधतात व ते कुठेही टाकतात. खासगी रिकामे प्लॉट हे अशा कचºयांचे ठिकाण बनू लागले आहेत. रुग्णालयातील तसेच दुकानांतील पॅकिंगचे प्लॅस्टिक ही अनेक ठिकाणी टाकलेले आढळतात. भटकी जनावरे (गाई , बैल, गाढव ) ही प्लॅस्टिक खात असल्याने त्यांना जीव गमवावा लागत आहे. या जनावरांचे मालक असतात, मात्र तरीही जनावरे मोकळी सोडली जातात. या जनावरांकडून प्लॅस्टिक खाल्ले जाते, प्लॅस्टिक सेवनामुळे जनावरांच्या पचनप्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. प्लॅस्टिकचे तुकडे हृदयात गेल्याने हृदयावर दाब पडून मृत्यू होत असल्याचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी सातकर यांनी सांगितले. बहुतांशी भटक्या जनावरांचा मृत्यू प्लॅस्टिक सेवन केल्याने होत असून, अनेक गार्इंच्या पोटात दोनशे ग्रॅम प्लॅस्टिक आढळून आल्याचे मंदीलकर यांनी सांगितले. यावरून प्लॅस्टिक जनावरांच्या मृत्यूचे कारण बनत असल्याचे वास्तव आहे.
माझी आई गेली कुठे?
गाय मृत्यूशी झुंज देत असताना तिचे वासरू एका कुत्रीचे दूध पितानाचा एक अनोखा प्रकार पाहवयास मिळाला. वास्तविक कुत्रे गाईच्या, तसेच तिच्या वासरांच्या मागे भूंकताना आढळून येतात. मात्र, वासरू कुत्रीचे दूध पितानाचा प्रकार सर्वानाच अचंबित करीत होता.