Courage is your main asset : Chetna Sinha | धाडस हेच आपले मुख्य भांडवल : चेतना सिन्हा
धाडस हेच आपले मुख्य भांडवल : चेतना सिन्हा

ठळक मुद्देमहिला नवउद्योजकांना सल्ला : ‘फिक्की फ्लो बझार’चे उद्घाटन, ‘लोकमत’चे सहकार्य

पुणे :  पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या महिलांनी आता उद्योगक्षेत्रातदेखील गौरवास्पद कामगिरी केली आहे. मात्र वर्षानुवर्षे चालत असलेल्या रूढी-परंपरेच्या ओझ्यामुळे त्यांच्यातील उद्योगातील नेतृत्व समोर येण्यास वेळ लागत आहे. आपले धाडस हेच आपले भांडवल आहे. 
हा मंत्र त्यांनी आपले नवे नेतृत्व निर्माण करण्याकरिता लक्षात ठेवला पाहिजे, असा सल्ला माणदेश या दुष्काळी भागातील स्त्रियांकरिता काम करणाऱ्या समाजसेविका चेतना सिन्हा यांनी दिला. 
 लोकमत, एफएलओ पुणे यांच्या सहकार्याने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की)तर्फे आयोजित ‘फिक्की फ्लो बझार’ प्रदर्शनाचे आयोजन सिन्हा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.  फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा रितू छाब्रिया, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, यूएसके फाउंडेशनच्या प्रमुख उषा काकडे, नगरसेवक आबा बागुल, ‘लोकमत’चे संपादक प्रशांत दीक्षित आदी उपस्थित होते. 
सिन्हा म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांना योग्य ते मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची गरज आहे. ते मिळाल्यास ते त्यांची गुणवत्ता सिद्ध करतील. माण तालुका पाण्याचे दुर्भिक्ष असलेला तालुका असून, अशा वेळी तेथील महिलांना कौटुंबिक जबाबदारी स्वीकारावी लागते. माणदेशी फाउंडेशनच्या निमित्ताने त्यांच्याकरिता काम करताना महिला सक्षमीकरणाच्याबाबत अनेक गोष्टींची माहिती झाली. धाडस अंगी बाणवल्याशिवाय त्यांना तरणोपाय नाही. 
सर्वसामान्य स्त्रीची दखल तेव्हाच घेतली जाईल ज्यावेळी ती धाडस दाखवून उद्योजकाच्या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करेल. त्याकरिता समाजातील विविध स्तरांतून तिला सन्मानाची वागणूक मिळायला हवी. 
बागुल म्हणाले, महिला उद्योजकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. एकूणच तरुण पिढीने व्यवसायात उतरण्याची गरज निर्माण झाली आहे. 
रितू छाब्रिया यांनी प्रास्ताविक केले. सोनिया राव यांनी सूत्रसंचालन केले. 
.........
लोकमत आणि वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरिता या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचा प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी महिलांच्या मूलभूत प्रश्नांवर उत्तरे शोधून त्यांना जगण्याचे बळ देणाºया सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा यांची उपस्थिती प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करते. याचा विशेष आनंद वाटतो.  - रितू छाब्रिया, अध्यक्ष, फिक्की फ्लो, पुणे चॅप्टर
.........
हे प्रदर्शन मंगळवारी (दि. १२) सकाळी १0.३0 ते सायंकाळी ७.३0 पर्यत शेरेटॉन ग्रँड, राजा बहादुर मिल रस्ता, संगमवाडी येथे सुरू राहणार आहे. 

Web Title: Courage is your main asset : Chetna Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.