आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणीचा वाचविला जीव, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केले समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:43 IST2019-07-29T22:43:06+5:302019-07-29T22:43:27+5:30
आर्मी कॉलनी येथे राहणारी एक २९ वर्षाची तरुणी मुंबईमध्ये नोकरी करत होती.

आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणीचा वाचविला जीव, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केले समुपदेशन
पुणे : प्रियकर लग्न करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नैराश्याने घेरलेल्या व आत्महत्या करण्याच्या तयारीने घरात स्वत:ला कोंडून घेतल्या तरुणीला महिला पोलीस अधिकाऱ्यांनी समुपदेशन करुन तिचा जीव वाचविला. हा प्रकार हडपसर भागातील आर्मी कॉलनीत सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला.
याबाबतची माहिती अशी, आर्मी कॉलनी येथे राहणारी एक २९ वर्षाची तरुणी मुंबईमध्ये नोकरी करत होती. तेथे तिचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. वर्ष, दोन वर्षे ते एकत्र होते. त्यानंतर तिने लग्नाबाबत विचारल्यावर त्याने मी पुण्याला येऊन तुझ्या आईवडिलांची भेट घेऊन मागणी घालतो, असे सांगितले. मात्र, त्यानंतर तो टाळाटाळ करु लागला. त्यामुळे निराश झालेल्या या तरुणीने नोकरी सोडली. ती पुण्यात आली. ती या तरुणाशी संपर्क साधून पुण्याला कधी येतो, याची विचारणा करत असे़ मात्र, तो आज उद्या करु लागला. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या या तरुणीने सोमवारी सकाळी स्वत:ला घरातील खोलीत कोंडून घेतले. घरातील लोकांनी दरवाजा
वाजवूनही तिने उघडला नाही. शेवटी त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. त्याबरोबर सकाळी साडेअकरा वाजता हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा बांम्बे व त्यांचे सहकारी तातडीने तेथे पोहचले. ही तरुणी कोणाचेच ऐकत नव्हती. तेव्हा वर्षा बाम्बे या पुढे झाल्या. त्यांनी दरवाजाच्या बाहेरुनच त्या तरुणीला बोलते केले.
तिच्याशी त्या बोलू लागल्या. पोलीस अधिकारी आपल्याशी बोलत असल्याचे समजल्यावर ही तरुणीही थोडी भानावर आली. तिने दरवाजा उघडला. पोलिसांनी खोलीत जाऊन पाहिले तर या तरुणीने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहिली होती. त्यानंतर या तरुणीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिची सर्व हकीकत जाणून घेतल्यानंतर तिला समजावून सांगण्यात आले. त्यानंतर ही तरुणी शांत झाली व
तिने आपण आता असा अविचार करणार नसल्याचे सांगितले. पोलिसांनी केलेल्या समुपदेशनामुळे आपली मुलीचा आत्महत्येचा विचार बदलल्याचे पाहून तिचे आईवडिल व भावाने पोलिसांचे आभार मानल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी सांगतले.