पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 06:28 IST2025-06-01T06:27:27+5:302025-06-01T06:28:50+5:30
नातेवाइकांनी मृतदेह पाहताच फोडला हंबरडा

पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
लोकमत न्यूज नेटवर्क, चाकण: कडाचीवाडी (ता. खेड) येथील पाझर तलावात पोहायला गेलेल्या चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ३१) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी स्थानिक नगरिकांच्या मदतीने चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढले.
ओमकार बाबासाहेब हंगे (वय १३, सध्या रा. मार्तंडनगर, मेदनकरवाडी, मूळ रा. हंगेवाडी, ता. केज, जि. बीड), श्लोक जगदीश मानकर (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी,मूळ रा. धनवडी, ता. वरुड, जि. अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा. अंबुलगा, ता. मुखेड, जि. नांदेड), नैतिक गोपाल मोरे (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा. बुलढाणा झरी बाजार, ता. अकोट, जि. अकोला)
अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. ही सर्व मुले सहावी-सातवीच्या वर्गात शिकत असल्याचे समजते.
नातेवाइकांनी मृतदेह पाहताच फोडला हंबरडा
याबाबतची अधिक माहिती अशी की, ओमकार, श्लोक, प्रसाद आणि नैतिक हे चौघे जण शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चाकण जवळील कडाचीवाडी गावाच्या हद्दीतील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहताना दमछाक होऊन या सर्वांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दुपारपर्यंत हे चौघे जण घरी न आल्याने नातेवाइकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. पाझर तलावाच्या काठावर त्यांच्या चपला व कपडे मिळून आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. चाकण पोलिसांनी माहिती मिळताच धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.
या प्रकरणी आकस्मिक मृत्यू, अशी नोंद केली आहे. नातेवाइकांनी मुलांचे मृतदेह पाहताच एकच हंबरडा फोडला. हे दृश्य हृदय हेलावून टाकणारे होते. या दुर्दैवी घटनेने चारही मुलांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.