पुणे महापालिकेच्या रेशन कीट वाटपात भ्रष्टाचार? पर्वती दर्शन नागरिकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 15:44 IST2020-05-25T15:40:55+5:302020-05-25T15:44:08+5:30
कीटमधील १३ वस्तूंपैकी एक लिटर तेल झाले गायब

पुणे महापालिकेच्या रेशन कीट वाटपात भ्रष्टाचार? पर्वती दर्शन नागरिकांचा आरोप
पुणे : कंटेन्मेंट एरियामध्ये महापालिकेकडून रेशन कीट वाटप करण्यात येत आहे. शहरातील विविध भागात तब्बल ७५ हजार कीट वाटण्याचे पालिकेचे नियोजन आहे. परंतू, तेरा वस्तूंचा समावेश असलेल्या या कीटमधून एक लिटर खाद्यतेलच गायब झाले आहे. प्रत्येकी दोन लिटर तेल देण्याचे नियोजन असतानाही केवळ एकच लिटर तेल कीटमध्ये देण्यात येत असल्याचा प्रकार पर्वती दर्शन वसाहतीमध्ये उघडकीस आला आहे. हा उघड उघड भ्रष्टाचार सुरु असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार भामरे यांनी केली आहे.
महापालिकेने शहरातील काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. या झोनमध्ये कीट वाटप सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत ५० हजारांच्यावर कीट वाटप पूर्ण झाल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या कीटमध्ये दोन किलो साखर, गव्हाचे पीठ पाच किलो, तेल दोन लिटर, तुरडाळ-१ किलो, तांदुळ-२ किलो, पोहे-१ किलो, मीठ- १ किलो, साबण (लाईफबॉय)-५६ ग्रॅम एक नग,
व्हिल साबण- १ नग, मिर्ची पावडर- २०० ग्रॅम, चहा पावडर-२०० ग्रॅम, दुध पावडर-२०० ग्रॅम अशा एकूण तेरा वस्तूंचा समावेश आहे. परंतू, पर्वती दर्शन येथील नागरिकांना वाटप केल्या जात असलेल्या कीटमध्ये दोन ऐवजी एकच लिटर खाद्य तेल देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या भागातील रहिवाशांनी दोन दिवसांपासून याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी सुरु केल्या होत्या. भामरे यांनी वाटप केले जात असलेल्या कीटची तपासणी केली असता त्यामध्ये तेलाची एक लिटरची पिशवी कमी असल्याचे निदर्शनास आले.
गोरगरिबांचे हे तेल चोरतंय कोण? या चोरीला जवाबदार कोण? असे प्रश्न नागरिक विचारु लागले आहेत.
=======
दोन तीन दिवसांपासून हे कीट वाटप या भागात सुरु आहे. या भागात जवळपास दीड ते दोन हजार कीट वाटप करण्यात आले आहे. या नागरिकांना एक लिटर तेल कमी मिळाले आहे. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी. यामध्ये भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे.
- तुषार भामरे, सामाजिक कार्यकर्ते
=======
पालिकेने नागरिकांना वाटप केलेल्या रेशन कीटमध्ये दोन लिटरऐवजी एकच लिटर तेल आहे. या किटवर ना पालिकेचे स्टिकर आहे, ना त्यांनी पुरविलेल्या साहित्याची यादी. याबाबत वाटप करणारे कर्मचारीही योग्य माहिती देत नाहीत.
- संतोष पवार, नागरिक, पर्वती दर्शन
=======
ड्यूटीवरील कर्मचारी बदलल्याने त्यांच्याकडून चुकून एक लिटरच तेल कीटमध्ये टाकले गेले. हा प्रकार एकाच लॉटबाबत घडला. ही चूक लक्षात आल्यावर दोन लिटर तेल कीटमध्ये जाईल याची दक्षता घेतली गेली आहे. तसेच ज्यांना एक लिटर तेल दिले गेले आहे त्यांना आणखी एक लिटर तेल पोहचविण्यात आले आहे. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार नसून वाटप सुरळीत सुरु झाले आहे.
- आशिष महाडदळकर, सहायक आयुक्त, कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय