coronavirus : जनता कर्फ्यूदिनी कामावर निघालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याला पाेलिसांकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 17:33 IST2020-03-23T17:29:57+5:302020-03-23T17:33:59+5:30
ओळखपत्र नसल्याने स्वच्छता कर्मचाऱ्याला पाेलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार येरवडा भागात घडला आहे.

coronavirus : जनता कर्फ्यूदिनी कामावर निघालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याला पाेलिसांकडून मारहाण
पुणे : रविवारी ( दि. 22 ) पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन देशातील सर्वच नागरिकांना केले हाेते. या काळात घराबाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी केले हाेते. यातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले हाेते. असे असताना ओळखपत्र नसलेल्या कंत्राटी कामगाराला पाेलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना येरवडा भागात घडली आहे.
पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कर्मचारी प्रतीक केगळे हे नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी निघाले हाेते. त्यावेळी बंदाेबस्ताला असलेल्या पाेलिसाने त्यांना थांबवले तसेच ओळखपत्राची मागणी केली. त्यावेळी त्यांच्याकडे ओळखपत्र नसल्याने पाेलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली. केगळे यांनी खाकी कपडे घातलेले असताना देखील त्यांना मारहाण करण्यात आल्याचे समाेर आले आहे. महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना कंत्राटदार ओळखपत्र देत नसल्याने अशा कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागताे. आपत्कालीन परिस्थितीत कंत्राटी कामगारांना त्वरित ओळखपत्र देण्यासंबधी संबंधीत ठेकेदारांना प्रशासनाने भाग पाडावे अशी मागणी पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केली आहे. कंत्राटी कामगारांच्या सर्व प्रश्नांच्यासंदर्भात लेखी निवेदनाद्वारे मागणी करून देखील संबंधित ठेकेदार व प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे असा आरोप युनियनच्या जनरल सेक्रेटरी काॅ. मुक्ता मनोहर यांनी केला आहे.
कामागार युनियनचे कार्यालयीन चिटणीस वैजनाथ गायकवाड म्हणाले, महापालिकेत सात हजार कंत्राटी कामगार आहेत. ते वेगवेगळ्या विभागात काम करतात. त्यांना कंत्राटदारांकडून ओळखपत्र दिले जात नाही. त्यामुळे आपत्कालिन वेळेस अशा कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. आपल्या कर्तव्यावर जाणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याला ओळखपत्र नसल्याने पाेलिसांनी मारहाण केल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने ओळखपत्र देण्याबाबत महापालिकेने कंत्राटदारांना भाग पाडावे अशी आमची मागणी आहे.