CoronaVirus In Pune: पुण्यात रात्रीची संचारबंदी; शाळा पुन्हा बंद; ‘हॉटस्पॉट’वर पुन्हा लक्ष केंद्रित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 07:02 IST2021-02-22T01:33:24+5:302021-02-22T07:02:00+5:30
‘हॉटस्पॉट’वर पुन्हा लक्ष केंद्रित

CoronaVirus In Pune: पुण्यात रात्रीची संचारबंदी; शाळा पुन्हा बंद; ‘हॉटस्पॉट’वर पुन्हा लक्ष केंद्रित
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरात आता रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत नियंत्रित संचारबंदी लागू झाली आहे. यासोबतच २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवणार आहेत.
शहर आणि जिल्ह्यातील निष्पन्न झालेल्या कोरोना ‘हॉटस्पॉट’मध्ये पुन्हा सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांचे नियोजन केले जाणार आहे. तसेच लग्न समारंभामध्ये केवळ २०० व्यक्तींनाच सहभागी होता येणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाणार असून, याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी घेतला.
कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे झालेल्या बैठकीमध्ये याबाबतचे निर्णय घेतले. बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (दूरदृश्य प्रणाली) आदी उपस्थित होते.