coronavirus: ‘Jalneti’ reduces the risk of coronavirus - Dr. Dhananjay Kelkar's claim | coronavirus: ‘जलनेती’ केल्याने कोरोनाच्या विषाणूचा धोका कमी - डॉ. धनंजय केळकर यांचा दावा 

coronavirus: ‘जलनेती’ केल्याने कोरोनाच्या विषाणूचा धोका कमी - डॉ. धनंजय केळकर यांचा दावा 

- राजानंद मोरे
पुणे : जगभरात कोरोना विषाणुला रोखण्यासाठी औषधे व लसींच्या चाचण्या सुरू असताना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी योगामधील ‘जलनेती’मुळे कोरोना विषाणुला दूर ठेवू शकत असल्याचा दावा केला आहे.

‘मागील तीन महिन्यांपासून नियमित जलनेती करणाऱ्या सहाशेवर डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. जलनेतीने कोरोनाचा संसर्ग होणारच नाही, असा दावा नाही. मात्र संसर्गाची शक्यता कमी होते’, असे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितले.
डॉ. केळकर यांनी योगातील एक पारंपरिक क्रिया ‘जलनेती’चा अभ्यास सुरू केला आहे. रुग्णालयातील सुमारे तीन हजार डॉक्टर, परिचारिका व कर्मचा-यांवर तीन महिने अभ्यास सुरू आहे. यातून सकारात्मक  निष्कर्षही मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे.

‘लोकमत’ला माहिती देताना डॉ. केळकर म्हणाले, मी साडे चार वर्षांपासून जलनेती करत आहे. कधीही संसर्ग होऊन सर्दी किंवा फ्लुची लक्षणे आढळली नाहीत. तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणारे रुग्णालयातील १२०० डॉक्टर व इतर कर्मचाºयांपैकी ६०० जण दिवसातून दोनदा जलनेती करत आहेत. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता आदी दक्षता घेतली जाते. या काळात त्यातील एकालाही कोरोना फ्लुची किंवा कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. जलनेती न करणारे अन्य ६०० जण तसेच रुग्णालयातील इतर १८०० जणांपैकी २२ जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे होती. हा तुलनात्मक अभ्यास आणखी तीन महिने सुरू राहील. नंतर हे संशोधन प्रसिद्ध केले जाणार आहे.

जलनेती कोणीही करू शकते

1जलनेतीमुळे नाकामध्ये सतत ओलावा राहतो. नाक स्वच्छ होऊन विषाणुंचा भार कमी होतो. नाक कोरडे पडले तर संसर्गाची शक्यता अधिक वाढते. नाकाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जलनेती केली जाते.
2बायपास, अस्थमा किंवा अन्य आजार असलेले तसेच जलनेतीचे पात्र व्यवस्थितपणे धरू शकणारे कोणीही जलनेती करू शकतात. माझे ९२ वर्षांचे वडील दीड महिन्यांपासून जलनेती करत आहेत, अशी माहिती डॉ. केळकर यांनी दिली. 

... तर ठरेल गेमचेंजर
पुढील तीन महिन्यांतील निष्कर्षामधून जलनेतीचा प्रभावीपणे परिणाम होत असल्याचे दिसून आल्यास हे महत्वपूर्ण संशोधन ठरेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल, असा आशावाद डॉ. केळकर यांनी व्यक्त केला. जलनेतीचे तोटे नाहीत. शक्य आहे ते करू शकतील, यासाठी माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: ‘Jalneti’ reduces the risk of coronavirus - Dr. Dhananjay Kelkar's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.