coronavirus : पुण्यात रविवारी आणखी ७२ रूग्णांची वाढ : पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 21:20 IST2020-04-26T21:19:15+5:302020-04-26T21:20:39+5:30
पुण्यात रविवारी काेराेनाचे नवे ७२ रुग्ण आढळले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील काेराेनाबाधितांची संख्या १ हजार १३९ इतकी झाली आहे.

coronavirus : पुण्यात रविवारी आणखी ७२ रूग्णांची वाढ : पाच जणांचा मृत्यू
पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या सलग शंभरच्या पुढेच वाढत असताना, गेल्या दोन दिवसांपासून हा आकडा शंभरीच्या आतच राहीला असून रविवारी शहरात ७२ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे पुणे शहरातील (पुणे महापालिका हद्दीत) कोरोनाबाधित रूग्णसंख्या १ हजार १३९ एवढी झाली आहे. तर ससूनमधील तीन जणांचा व मंगेशकर हॉस्पिटलमधील दोन अशा पाच जणांना आज मृत्यू झाला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसातपर्यंत शहरात ७२ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून, यापैकी ६१ रूग्ण हे नायडू व पालिकेच्या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहेत. तर, ११ कोरोनाबाधितांवर खाजगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. सध्या शहरातील विविध रूग्णालयात दाखल असलेल्या एकूण कोरोनाबाधित रूग्णांपैकी ४४ जणांची प्रकृती गंभीर असून, यापैकी सर्वाधिक २८ रूग्ण हे एकट्या ससून हॉस्पिटलमध्ये आहेत. दरम्यान आणखी ६ कोरोनामुक्त रूग्णांना रविवारी घरी सोडण्यात आले आहे. यामुळे पुणे शहरातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही १६५ झाली आहे.
आज मृत्यू पावलेले पाचही रूग्ण हे विविध आजारांनी ग्रस्त होते. शहरातील या नव्या ५ मृत्यूमुळे शहरात कोरोनाबाधित रूग्णांच्या मृतांची संख्या ७२ झाली आहे. या रूग्णांपैकी तीन जण ससून हॉस्पिटलमधील व दोन जण मंगेशकर हॉस्पिटलमधील आहेत.