Corona virus : धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू, येरवड्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 00:22 IST2020-07-31T00:22:39+5:302020-07-31T00:22:58+5:30
येरवड्यातील संत ज्ञानेश्वर वसतीगृह येथील दुर्दैवी घटना

Corona virus : धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू, येरवड्यातील घटना
पुणे : कोरोना पॉझिटिव्ह महिलेला वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची गंभीर घटना येरवड्यातील संत ज्ञानेश्वर वसतिगृह येथे गुरुवारी दुपारी घडली.
आशा पुरुषोत्तम पाटील (वय 45 रा. चौधरी नगर मुंजाबा वस्ती धानोरी) असे मृत्यू झालेेल्या महिलेेेचे नाव आहे. महापालीकेेने शहरात अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथे कोरोना पॉझिटिव्ह सामान्य रुग्णांवर उपचार केले जातात. येरवड्यातील सेंटरमध्ये आवश्यक योग्य उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे या महिलेचा 24 तासात मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणी जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी येरवडा नागरिक कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा पाटील व पुरुषोत्तम पाटील यांची बुधवारी कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी शांतीनगर येथील संत ज्ञानेश्वर वसतिगृह येथे सायंकाळी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी करून आवश्यक औषधे दिल्यानंतर आशा यांना तिसऱ्या मजल्यावर तर पती पुरुषोत्तम यांना दुसऱ्या मजल्यावर खोली मिळाली होती. बुधवारी रात्रीपासून आशा यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. गुरुवारी सकाळी 11 वाजता श्वास घेण्यासाठी जास्त त्रास होऊ लागल्यामुळे याची माहिती डॉक्टरांना दिल्यावर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यांची प्रकृती जास्त खालावल्यामुळे दुपारी त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
आशा यांना ऑक्सिजन व इतर आवश्यक साधने देखील वेळेवर मिळाली नसल्याचे त्यांचे पती पुरुषोत्तम पाटील यांनी सांगितले. तसेच पत्नीला जर वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुरुषोत्तम पाटील हे पत्नी आशा यांच्यासह भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
.