Corona virus : आधी दिला मृतदेह ताब्यात नंतर आला कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट; ससूनमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 18:58 IST2020-04-28T18:57:08+5:302020-04-28T18:58:58+5:30
नातेवाईकांनी अंत्यविधी केल्यानंतर ही महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा आला अहवाल

Corona virus : आधी दिला मृतदेह ताब्यात नंतर आला कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट; ससूनमधील धक्कादायक प्रकार
पुणे : एका कोरोनाची लागण झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या कोरोना तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अंत्यविधीला घरातील नातेवाईक आणि शेजारचे नागरिक उपस्थित होते.अंत्यविधी झाल्यावर ससूनकडे ही महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट आला. त्यानंतर मात्र नातेवाईकांची पाचावर धारण बसली. या महिलेच्या मुलगा, पतीसह दोन शेजाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
गुलटेकडी परिसरातील डायस प्लॉट भागात घडलेल्या या घटनेमुळे नागरिक ससूनच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करीत आहेत. याभागातील एका महिलेला त्रास होत असल्याने ससून रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ससूनकडून त्यांचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. परंतू, तोपर्यंत त्यांच्या तपासणीचा अहवाल आलेला नव्हता. नातेवाईकांनी अंत्यविधी केल्यानंतर ही महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आला. याबाबत नातेवाईकांना माहिती कळविण्यात आली. अंत्यविधीला असलेल्या नागरिकांची पाचावर धारण बसली.
महापालिके ला हा प्रकार समजल्यानंतर आरोग्य विभागाकडून कुटुंबियांसह एकूण २४ नागरिकांच्या घशातील द्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. या तपासणीमध्ये संबंधित महिलेचा पती, मुलगा आणि शेजारी राहणारे दोघे असे एकूण चौघे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. या सर्वांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. या संपुर्ण प्रकाराची चर्चा गुलटेकडी परिसरात सुरु आहे.