Corona virus : पीएमपी कर्मचाऱ्यांनाही हवे ‘सुरक्षा कवच’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 19:35 IST2020-04-10T19:34:49+5:302020-04-10T19:35:47+5:30
महापालिकेकेने कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे सुरक्षा कवच दिले..

Corona virus : पीएमपी कर्मचाऱ्यांनाही हवे ‘सुरक्षा कवच’
पुणे : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना विषाणुचा संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबियांसाठी सुरक्षा कवच ही योजना लागु केली आहे. या योजनेतून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांना वगळण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभुमीवर या योजनेत पीएमपी अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्याची मागणी महामंडळाने पालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेकेने कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे सुरक्षा कवच दिले आहे. कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटूंबियांना एक कोटी रुपये तसेच अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेनेही अशाच प्रकारचे सुरक्षा कवच तेथील कर्मचाऱ्यांना दिले आहे. मात्र, या योजनेतून पीएमपी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी पीएमपी कामगार युनियनने पीएमपी अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे सुरक्षा कवच योजनेत समावेशाबाबत मागणी केली होती. त्यानुसार सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी गुरूवारी एका पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. पीएमपीकडून सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ५० हून अधिक मार्गांवर सुमारे ११० बसमार्फत सेवा पुरविली जात आहे. या बस दररोज रात्री स्वच्छ केल्या जातात. पीएमपीची पुष्पक शववाहिनीही पुरविली जात आहे. पुणे महापालिकेच्या विविध रुग्णालयातील १२८ परिचारिकांना शुक्रवारपसाून मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. तसेच महापालिकेने त्यांच्या वाहनांसाठी पीएमपीचे २५ चालकही घेतले आहेत. या यंत्रणेमध्ये पीएमपी अधिकाºयांसह शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यां नाही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे त्यांनाही सुरक्षा कवच योजना लागु करण्याची मागणी युनियनने केली आहे.