Corona virus : पुणे महापालिकेची मुख्यसभा यापुढे होणार 'व्हर्च्युअल' ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 16:31 IST2020-07-06T16:30:45+5:302020-07-06T16:31:32+5:30
नागरिकांना मात्र सहभागी होता येणार नाही

Corona virus : पुणे महापालिकेची मुख्यसभा यापुढे होणार 'व्हर्च्युअल' ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
पुणे : महापालिकेची मुख्यसभा यापुढे 'व्हर्च्युअल' होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यसभेला गॅलरीमध्ये उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना मात्र सभेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे.
राज्य शासनाने महापालिका, नगरपरिषदा / नगरपंचायती यांनी त्यांच्या सर्वसाधारण सभा तसेच विविध विषय समित्यांच्या नियतकालिक सभांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे निर्देश शासनाने दिले आहेत. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सुरक्षित अंतर व अनुषंगिक मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती अधिनियमातील तरतुदीनुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या नियोजित सभा, बेठका घेणे बंधनकारक आहे. या सभा न झाल्यास लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती लागते. त्यामुळे या सभा घेणे आवश्यक असते. परंतु, पुढील आदेश होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या सर्व बैठका, सभा या नियमितपणे केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घ्याव्यात असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
त्यामुळे, पालिकेच्या मुख्यसभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जाणार आहेत. मुख्यसभेला नेहमी नागरिक गॅलरीमध्ये उपस्थित राहतात. यासोबतच सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही उपस्थित असतात. परंतु, यापुढे केवळ महापौर, उपमहापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सभागृहात उपस्थित राहू शकतील. नगरसेवक मात्र सभेला ऑनलाईन हजेरी लावू शकणार आहेत. गटनेते यांनाही सभेला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असे नगरसचिव सुनील पारखी यांनी सांगितले.