Corona Virus : ना कसलं भान, ना परिस्थितीची जाण; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजितदादांसमोरच तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 23:00 IST2021-06-19T22:42:34+5:302021-06-19T23:00:41+5:30
पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी राष्ट्रवादीला कोरोनाचं भानच उरलं नसल्याचं दर्शवत आहेत. एकीकडे पुण्यात शनिवार आणि रविवारचा विकेंड लॉकडाऊन पुन्हा सुरू केला आहे

Corona Virus : ना कसलं भान, ना परिस्थितीची जाण; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजितदादांसमोरच तोबा गर्दी
पुणे - पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, याप्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाली. विशेष म्हणजे खुद्द अजित पवारांनी देखील आपणच नियम करायचे आणि मोडायचे हे काही पटत नव्हते असे सांगतानाच तुम्ही नियमांचे पालन केले नाही, अशी खंतही व्यक्त केली. मात्र, पक्षाच्या कार्यक्रमाला एवढे गर्दी झाल्याने सोशल मीडियावरुन राष्ट्रवादीसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे.
पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी राष्ट्रवादीला कोरोनाचं भानच उरलं नसल्याचं दर्शवत आहेत. एकीकडे पुण्यात शनिवार आणि रविवारचा विकेंड लॉकडाऊन पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे, गर्दी टाळणे आणि सार्वजनिक कार्यक्रम न घेणे हे सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीतील कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याने महाविकास आघाडी सरकारवरही टीका होत आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन अतिशय साध्या पद्धतीने ऑनलाईन बैठक घेऊन साजरा केला. मात्र, दुसरीकडे अजित पवारांच्या उपस्थितीतील ही तोबा गर्दी कोरोनाचे संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळेच, विरोधकांनीही या कार्यक्रमावरुन राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली आहे.
पुणेकरांच्या संकटात भर टाकणारी गर्दी
भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गोळा केलेली गर्दी ही पुणेकरांच्या संकटात भर टाकणारी आहे. तसेच या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियमांची पायमल्ली करत जगताप यांनी गोळा केलेली गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रित करणारी आणि पुणेकरांच्या जीवाशी खेळणारी आहे. एकीकडे शेकडो वर्षांची शिस्तबध्द परंपरा असणाऱ्या वारकरी संप्रदायाला पायी पालखीसाठी परवानगी नाकारणे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बेशिस्तीचे प्रदर्शन करणे बेजबादारपणाचे आहे. असे आयोजन टाळायला हवे होते. यांच्या चमकोगिरीमुळे खुद्द अजितदादांना दिलगिरी व्यक्त करावी लागली असेही मुळीक यांनी यावेळी म्हटले.