Corona Virus News : बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 20:01 IST2021-02-25T19:59:16+5:302021-02-25T20:01:48+5:30
गेल्या काही दिवसांपासुन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक प्रक्रियेत होते.

Corona Virus News : बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे कोरोना पॉझिटिव्ह
बारामती: बारामती शहरात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे. मात्र याच दरम्यान प्रांताधिकारीच कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे प्रशासनासमोरच प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासुन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक प्रक्रियेत होते.या दरम्यान सर्वांनी कोरोनाची नियमावली पायदळी तुडविल्याचे चित्र प्रशासन भवनात होते. याच गर्दीचा फटका प्रांताधिकाऱ्यांना बसल्याची शक्यता आहे. प्रांताधिकारी कांबळे यांना बुधवारी( दि २४) अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी रात्री तातडीने येथील मंगल लॅबमध्ये कोरोना तपासणी केली. त्यानंतर रात्री उशिरा मिळालेल्या अहवालानुसार त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना रात्रीच शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची रेमडेसिव्हर इंजेक्शन देण्यात आले असुन त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, शहरात कोरोना वाढत असताना याबाबत प्रमुख अधिकारी असणाऱ्या प्रांतांना काही दिवस या जबाबदारीपासुन दुर रहावे लागणार आहे.त्यामुळे कोरोना उपाययोजनासह निर्णयप्रक्रियेचा प्रश्न निर्माण झाला आाहे. याबाबत तहसिलदार विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की ,जिल्हाधिकारी याबाबत समकक्ष अधिकाऱ्याची लवकरच नियुक्ती करतील. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे बारामतीकरांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही,असे पाटील म्हणाले.