Corona virus : पुण्यातील 'जम्बो कोविड सेंटर'चे काम जलदगतीने पूर्ण करा: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 16:52 IST2020-08-07T16:50:07+5:302020-08-07T16:52:59+5:30
कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजन बेडची क्षमता वाढवण्याची सूचना

Corona virus : पुण्यातील 'जम्बो कोविड सेंटर'चे काम जलदगतीने पूर्ण करा: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
पिंपरी : राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नेहरूनगर येथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. याची पाहणी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आज पाहणी केली. त्यावेळी ‘कोविड सेंटरचे काम जलदगतीने पूर्ण करावे. पावसाचे पाणी साचणार नाही. याची दक्षता घ्यावी, आॅक्सिजन बेडची क्षमता वाढवा, अशा सूचना केल्या. कामाचा आढावा घेतला.
पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यानुसार राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. वाढत्या रूग्णांच्या सोयीसाठी पिंपरी येथील नेहरूनगर मध्ये नव्याने एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी येणारा पन्नास टक्के निधी राज्य सरकार आणि पन्नास टक्के निधी पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळणार आहे. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडीयमच्या कोवीड सेंटर कामाची पाहणी पवार यांनी पाहणी सकाळी केली. विभागीय आयुक्त सौरभ राव , जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, समीर मासूळकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिसरात फिरून रूग्णालय कसे उभारले जाणार आहे, याची माहिती घेतली. तसेच आयसीयू बेडची उभारणी करताना त्यांची उंची किती असावी, कोणत्या प्रकारचे साहित्य वापरण्यात येणार आहे. याबाबतचीही माहिती घेतली. सूचनाही केल्या. रूग्णवाढीचा आढावाही घेतला.
अजित पवार म्हणाले, ‘‘प्रशासनाने कोवीड केअर सेंटरचे काम जलदगतीने पूर्ण करावे. आॅक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यात यावी. काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे का, काम चांगले करा. पावसाचे पाणी साचणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. आॅक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यात यावी.’’