Corona virus : Continue to provide essential services in areas of sealed by Corona | Corona virus :कोरोनामुळे सील केलेल्या भागात अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवा

Corona virus :कोरोनामुळे सील केलेल्या भागात अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवा

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांचे यंत्रणेला आदेश सील केलेल्या भागातील दूध, भाजीपाला, गॅस, औषधे यांचा पुरवठा सुरु राहील. परिसरातील स्वच्छता गृहे, गल्लीबोळ निजंर्तुकीकरण करण्यावर अधिक भर देण्यात येणार

पुणे : पुण्यात काही भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने मंगळवारी मध्यरात्री पासून कोरोना बाधित परिसर सील केला आहे. या भागात अत्यंत कडक संचारबंदी लागू आहे. परंतु यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सील केलेल्या भागात अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी संबधित यत्रणेला दिले आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे शहरातील काही भाग प्रशासनाने सील करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवार (दि.7) रोजी विभागीय आयुक्त यांनी उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत अंमलबजावणीबाबत आढावा घेतला.यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम्, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची उपस्थिती होती.
शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोंढवा तसेच महर्षीनगर ते आर. टी. ओ. कार्यालयापर्यंतचा जुन्या पेठांचा भाग काल मध्यरात्रीपासून सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. सील केलेल्या भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आधिक आहे. त्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांनाही संसर्ग होण्याच्या शक्यतेने प्रशासन याबाबत अधिक सक्रिय झाले आहे. सील केलेल्या भागातील नागरिकांनी संचारबंदीचे आदेश पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. या सील केलेल्या भागातील दूध, भाजीपाला, गॅस, औषधे आदिंचा पुरवठा सुरु राहील. परिसरातील स्वच्छता गृहे, गल्लीबोळ निजंर्तुकीकरण करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. डॉक्टर, अत्यावस्थ रुग्ण, अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना यातून सूट मिळेल. 
परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे, संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी स्वयंसेवी संस्था पोलीस विभागातर्फे समुपदेशन करुन प्रशासन आपल्या पाठीशी असल्याची भावना लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे,अशा स्वरुपाच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

Web Title: Corona virus : Continue to provide essential services in areas of sealed by Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.