Corona virus : पुण्यात होम क्वारंटाईनमधील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये संभ्रमावस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 11:42 IST2020-08-07T11:41:49+5:302020-08-07T11:42:33+5:30
खासगी रुग्णालयांकडून लूट आणि दुसरीकडे पालिका रुग्णालयांची अनास्था अशा अवस्थेतून रुग्णांनी कसा मार्ग काढायचा..

Corona virus : पुण्यात होम क्वारंटाईनमधील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये संभ्रमावस्था
पुणे : रुग्णालयांमधील बेड गरजू रुग्णांना उपलब्ध व्हावेत, यासाठी अतिसौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेले कोरोनाबाधित रुग्ण 'होम क्वारंटाईन' मध्ये राहण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर महापालिका रुग्णालयांशी संपर्क साधल्यावरही दोन-चार दिवसांपर्यंत काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने पुढे काय करायचे, याबाबत रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. एकीकडे खासगी रुग्णालयांकडून लूट आणि दुसरीकडे पालिका रुग्णालयांची अनास्था अशा अवस्थेतून रुग्णांनी कसा मार्ग काढायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हडपसरमधील काळे पड्याळ येथील एका ३८ वर्षीय महिलेला चार-पाच दिवसांपासून सर्दी, अंगदुखी असा त्रास जाणवत होता. सुरुवातीला फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने औषधे घेऊनही फरक पडत नसल्याने तिने जवळच्या पालिका रुग्णालयात कोरोनाची टेस्ट करून घेतली. रिपोर्ट यायला दोन दिवस लागले, तोवर तिला होणारा त्रास कमी झाला होता. मात्र, टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क करून पुढील प्रक्रियेबाबत विचारणा केली. तुम्हाला फोन येईल आणि मार्गदर्शन केले जाईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर दोन-तीन दिवस स्वतःहून संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी कुटुंबियांनी खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला.
सिंहगड रस्त्यावरील माणिक बाग येथे राहणाऱ्या एका रुग्णालाही होम क्वारंटईनमध्ये असणाऱ्या रुग्णालाही असाच अनुभव आला. महापालिकेचे टेलिमेडिसीनसाठी असलेले 'आरोग्य धीर' अँप्लिकेशन डाउनलोड केले. सुरुवातीचे तीन-चार दिवस नियमितपणे तब्येतीच्या चौकशीसाठी फोन येत होते. नंतर मात्र प्रतिसाद मिळणे, फोन येणे, फोनला उत्तर मिळणे बंद झाले. एकीकडे, खाजगी रुग्णालये पॅकेजच्या नावाखाली रुग्णांना लुटत आहेत. त्यामुळे रुग्ण पालिकेच्या सुविधेवर अवलंबून राहत आहेत. मात्र, एकीकडे खाजगी रुग्णालयांकडून लूट आणि दुसरीकडे पालिका रुग्णालयांची अनास्था अशा अवस्थेतून रुग्णांनी कसा मार्ग काढायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टेलिमेडिसीनच्या सहाय्याने रुग्णांना व्यवस्थित सुविधा मिळाव्यात, यासाठी या डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली आहे. रुग्णांनी कोणतीही तक्रार असल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
----
आयएमएतर्फे होम क्वारंटाईन सुविधा, मात्र पेड
इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे होम क्वारंटईन रुग्णांसाठी डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार रुग्णाने घरी कोणती वैद्यकीय साधने बाळगावीत, रक्तदाब, ऑक्सिजन पातळी कशी तपासावी, कोणती औषधे घ्यावीत याबाबत मार्गदर्शन केले जाते, अशी माहिती आयएमए पुणेच्या अध्यक्षा डॉ. आरती निमकर यांनी दिली. या सुविधेसाठी दिवसाला ३००-५०० रुपये आकारले जात आहेत.