Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ९९ ची भर; बरे झालेले ६१ रुग्ण घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 22:31 IST2020-05-08T22:30:27+5:302020-05-08T22:31:24+5:30
शहरात एकूण रूग्णांची संख्या २ हजार २४५

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ९९ ची भर; बरे झालेले ६१ रुग्ण घरी
पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून शुक्रवारी दिवसभरात ९९ नवीन रूग्णांची भर पडली. शहरात एकूण रूग्णांची संख्या २ हजार २४५ झाली आहे. दिवसभरात एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनावर मात करीत पूर्णपणे बरे झालेल्या ६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ७६ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
शुक्रवारी रात्री साडे आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ९९ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०९, नायडू रुग्णालयात ६९ तर खासगी रुग्णालयांमध्ये २१ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ६४ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात शुक्रवारी १२ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १३७ झाली असून यामध्ये ग्रामीण हद्दीतील एका मृताचा समावेश आहे. दिवसभरात एकूण ६१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयातील ४३, ससूनमधील ८ तर खासगी रुग्णालयांमधील १० रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७३२ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ३७७ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १ हजार ६४२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २० हजार २७० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ९८२, ससून रुग्णालयात १२१ आणि खासगी रुग्णालयांमध्ये २७४ रुग्ण उपचार घेत आहेत.