Corona Virus : पान, तंबाखू,गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर होणार कडक कारवाई; ग्रामीण पोलीस 'अॅक्शन मोड' मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 21:43 IST2020-08-27T21:42:22+5:302020-08-27T21:43:53+5:30
पुणे शहरांप्रमाणेच,ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसुन येत आहे.

Corona Virus : पान, तंबाखू,गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर होणार कडक कारवाई; ग्रामीण पोलीस 'अॅक्शन मोड' मध्ये
उरुळी कांचन: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ग्रामीण पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून विना मास्क फिरणाऱ्यांवर व पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर आगामी काळात कडक कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेश दिले आहेत.
पुणे शहरांप्रमाणेच,ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसुन येत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विना मास्क बाहेर पडणारे अथवा पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर दंड आकारणीबरोबरच, कारवाई करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र काही अपवाद वगळता बहुतांश ग्रामपंचायतींनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यापुढील काळात कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहे.
याबाबत पोलीस अधिक्षक संदीप पाटील म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पोलिसांना रस्त्यावर उतरण्याच्या सुचना दिल्या आहेत व नियमांचा वारंवार भंग करणाऱ्याच्या विरोधात भारतीय साथरोग अधिनियम १८९७, भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलिस अधिकारी, होमगार्ड अथवा विशेष पोलीस अधिकारीही यापुढील काळात कारवाई करु शकणार आहेत.