सोशल मीडियावरील पोस्टवरून वाद; खडक पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 19:27 IST2025-11-01T19:26:47+5:302025-11-01T19:27:04+5:30
चारित्र्यावर बोलून बदनामी करीत असल्याचे म्हटले आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी त्या घरी गेल्या असता शिवीगाळ करीत, 'तुला आता जिवंत सोडणार नाही' अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे

सोशल मीडियावरील पोस्टवरून वाद; खडक पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार
पुणे : सत्ताधारी पक्षातील एका महिलेबाबत सोशल मीडियावर मत व्यक्त केल्याचा राग मनात धरून महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात तीन महिलांसह चौघांवर, तसेच परस्पर विरोधी गुन्ह्यामध्ये एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शुक्रवार पेठेतील एका ४२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि.३०) सायंकाळी शुक्रवार पेठेत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर राजकीय पक्षाच्या महिलेबाबत एक पोस्ट टाकली होती. याचा राग मनात धरून चौघा आरोपींनी फिर्यादींच्या घरी जाऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात फिर्यादी जखमी झाल्या. त्याचबरोबर आरोपींपैकी एकाने गोंधळाच्या वातावरणात १० हजार रुपये किमतीचा मोबाइल नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तर परस्पर विरोधी तक्रारीमध्ये महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने तक्रारीत, आरोपी महिला ही फिर्यादींच्या चारित्र्यावर बोलून बदनामी करीत असल्याचे म्हटले आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी त्या घरी गेल्या असता शिवीगाळ करीत, 'तुला आता जिवंत सोडणार नाही' अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास खडक पोलिस ठाण्याकडून सुरू आहे.