पैसे थकविणाऱ्या बिल्डरच्या कार्यालयासमोर ठेकेदाराने केले विषारी औषध प्राशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 00:03 IST2021-08-27T00:02:35+5:302021-08-27T00:03:17+5:30
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

पैसे थकविणाऱ्या बिल्डरच्या कार्यालयासमोर ठेकेदाराने केले विषारी औषध प्राशन
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : कामाचे पैसे न मिळाल्याने ठेकेदाराने बिल्डरच्या कार्यालयासमोर मंगळवारी (दि. २४) सकाळी दहाच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान बुधवारी (दि. २५) सकाळी सव्वासहाच्या सुमारास ठेकेदाराचा मृत्यू झाला. चिंचवड येथे ही घटना घडली. ठेकेदाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित बिल्डरांसह इतरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
प्रवीण पंडित पाटील (वय ४९, रा. कोथरूड, पुणे, मूळ रा. जळगाव), असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत त्यांचा मेहुणा विनोद भाऊराव पाटील (वय ४८, रा. जळगाव) यांनी बुधवारी (दि. २५) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राजेश जगदीशप्रकाश अगरवाल, संतोष रामअवतार अगरवाल, राहुल भंडारी, अजित सुभाष गायकवाड, अभिजित गायकवाड, सचिन किल्लेदार, ललित जैन आणि इतर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी राहुल भंडारी व ललित जैन यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत (दि. २९) पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रवीण पाटील हे बिल्डरांकडून ठेकेदारी पद्धतीने काम घ्यायचे. मात्र, काही बिल्डरांनी काम झाल्यावरही प्रवीण यांच्या कामाचे पैसे दिले नाहीत. पैशांची मागणी करण्यासाठी प्रवीण हे मंगळवारी (दि. २४) चिंचवड स्टेशन येथील अगरवाल यांच्या कार्यालयात गेले. मात्र त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे प्रवीण यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारस त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीण यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यात पाच आरोपींची नावे आहेत. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर पाटील तपास करीत आहेत.