कंटेनर व कारची धडक; कंटेनर दोन पुलांच्या मध्ये गेला, दोन जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 16:34 IST2024-11-30T16:30:03+5:302024-11-30T16:34:10+5:30
नसरापूर उड्डाणपूल संपताना येणाऱ्या पुलाचे काम अनेक वर्षे रखडल्याने येथे नेहमी अपघात होत असतात

कंटेनर व कारची धडक; कंटेनर दोन पुलांच्या मध्ये गेला, दोन जण गंभीर जखमी
नसरापूर : नसरापूर (ता. भोर) येथील पुणे सातारा या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल नंतरच्या देगाव फाट्यावरील दोन पूलांच्या मध्ये गेल्याने अडकला आहे. या अपघातात दोन जण गंभीर झाले आहे. भरधाव कंटेनरने कारला धडकल्याने कार मधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत .
पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या औषधाने भरलेला कंटेनर आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात सर्जेराव सखाराम पाटील (वय ६०), बायक्का सर्जेराव पाटील (वय ५०), प्रवीण सखाराम पाटील (वय ३५), इरा पाटील (वय साडे ३ वर्ष ) सर्व रा. दरेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर अशी कारमध्ये जखमी असलेल्यांची नावे आहेत . हा अपघात सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला. सर्जेराव पाटील व त्यांची पत्नी बायका पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या अपघाता नंतर महामार्गावर देगाव फाटा ते वरवेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना तातडीने कार व कंटेनर बाजूला घेण्याचे काम सुरू करावे लागले. नसरापूर उड्डाणपूल संपताना येणाऱ्या पुलाचे काम अनेक वर्षे रखडले असून तो अरुंद आहे. त्यामुळे येथे नेहमी अपघात होत असतात. हे अपघात प्रवणक्षेत्र बनले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सातारा महामार्गावर पुण्यावरून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील चालकाने अचानक कार दुसऱ्या लेन वर घेतल्याने मागून येणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटून कारला धडक देत थेट महामार्गावरील पुलाच्या मधोमध जाऊन कंटेनर लटकला आहे. या अपघातामुळे दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नाही, मात्र पुढील तपास पोलीस करत आहेत.