पुणे : लहान भाऊ सतत दारू पितो, कोणताही काम धंदा न करता सतत त्रास देतो. या कारणातून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार केले. यात लहान भावाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १४) सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. प्रवीण उर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (रा. अप्पर, सुपर गणेशनगर, लेन नं. ३) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अनिकेत दत्तात्रय नवले (२६) याला ताब्यात घेत अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि अनिकेत सख्खे भाऊ असून, बिबवेवाडीत राहायला आहेत. मागील काही दिवसांपासून प्रवीण सतत दारू पिऊन कुटुंबीयांना त्रास देत होता. काहीही कामधंदा न करता रोज त्रास दिल्यामुळे अनिकेत वैतागला होता. त्याच रागातून सोमवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर राग सहन न झाल्यामुळे अनिकेतने प्रवीणवर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केले. नागरिकांनी प्रवीणला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.