२०२९ ला बारामती विधानसभा निवडणूक काँग्रेस लढणार आणि आमचाच उमेदवार निवडून येणार - हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 21:09 IST2026-04-10T21:08:28+5:302026-04-10T21:09:07+5:30

बारामतीत संघटन बांधणीला सुरुवात केली आहे आणि बारामती काँग्रेसमय करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत

Congress will contest the Baramati assembly elections in 2029 and our candidate will be elected - Harshvardhan Sapkal | २०२९ ला बारामती विधानसभा निवडणूक काँग्रेस लढणार आणि आमचाच उमेदवार निवडून येणार - हर्षवर्धन सपकाळ

२०२९ ला बारामती विधानसभा निवडणूक काँग्रेस लढणार आणि आमचाच उमेदवार निवडून येणार - हर्षवर्धन सपकाळ

बारामती: बारामतीत सहानुभूतीच्या पार्श्वभूमीवर विवेकबुद्धीच्या तत्त्वानुसार निवडणूक अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कोणत्याही रणनीतीचा विचार नव्हता. वैचारिक विरोध तर आहेच; परंतु आलेल्या विनंतीमुळे हा निर्णय झाला. बारामतीत संघटन बांधणीला सुरुवात केली आहे आणि बारामती काँग्रेसमय करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. २०२९ मध्ये काँग्रेस बारामती विधानसभेची निवडणूक लढवणार आणि आमचाच उमेदवार निवडून येणार, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

शुक्रवारी (दि.१०) सपकाळ बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह बारामतीतील पदाधिकारी उपस्थित होते. सपकाळ पुढे म्हणाले, अर्ज माघारी घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर नेत्यांचे फोन आले. आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली; परंतु राष्ट्रवादीचे दिल्लीत वजन असलेल्या खासदारांनी मला किंवा आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना संपर्क साधलेला नाही, असा टोमणा सपकाळ यांनी राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष सुनील तटकरे यांना न घेता लगावला. बारामतीत संस्कृती आणि सभ्यतेतून अर्ज मागे घेतला; परंतु कोणाला मतदान करावे, हे बारामतीकरांना सांगणार नाही. त्यांनी विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे, असे सपकाळ म्हणाले.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या चर्चेच्या निमित्ताने आमदार रोहित पवार भेटले. यावेळी ‘अजितदादां’च्या विमान अपघाताच्या पाठपुराव्याबद्दल चर्चा झाली. आमचीदेखील या अपघाताबद्दल चौकशी करण्याची भूमिका आहे. काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये खासदार राहुल गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे एफआयआर नोंदवला गेला; परंतु महाराष्ट्रात त्याबद्दल टाळाटाळ केली जात आहे. गुरुवारी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांसोबत चर्चा झाली. आता झीरो नंबरने एफआयआर आपल्याकडे आल्यावरही चौकशी होत नाही. सरकार यावर काही कार्यवाही करीत नाही, ही वस्तुस्थिती निदर्शनास आणली. कर्नाटकमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली. काल आमदार पवार, काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे, माजी मुख्यमंत्री विजयकुमार सिंग तेथे भेटले. तेथील उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचीही भेट झाली. त्यांचीदेखील यावर चर्चा झाली. या प्रकरणाचा पाठपुरावा करू, तसेच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याची चर्चा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यासमवेत झाली आहे. या चर्चेला बारामतीच्या अर्ज माघारीची पार्श्वभूमी आहे, तसेच या निमित्ताने काँग्रेसने या अपघात प्रकरणाचा पाठपुरावा सर्वांसमक्ष मांडत असल्याचे सपकाळ म्हणाले. 

भाजप हा खोकला पक्ष आहे. त्या पक्षाकडे विचार नाही, नीतिमत्ता नाही. भाजपला आम्ही धडकी भरवून सोडणार आहोत. भाजपच्या मित्रपक्षांविरोधात आमची तीव्र संघर्षाची भूमिका आहे. भाजप व मित्रपक्षांना चेटकिणीसारखा आजार झाला आहे. चेटकीण जशी मुले खाते, तसे हे इतर पक्षांतील नेते खातात, अशा शब्दांत सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याचा अपघात घडल्यावर साधी चौकशी होत नाही, यात ‘डाउनफॉल’ दिसतो आहे. सभ्यता संभाळली जात नाही, वारसा जोपासला जात नाही, विखारी भाजपसोबत त्यांना राहावे लागत आहे, तिथे ‘डाउनफॉल’ आहे, असा टोला सपकाळ यांनी पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर लगावला. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी खरात प्रकरणात चुप्पी साधली आहे. खरातचा विषय रेंगाळत ठेवण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. भाजपकडून जाती- धर्मांचे राजकारण केले जात आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे सपकाळ म्हणाले.

Web Title : कांग्रेस 2029 का बारामती चुनाव लड़ेगी और जीतेगी: हर्षवर्धन सपकाल

Web Summary : हर्षवर्धन सपकाल ने 2029 का बारामती चुनाव लड़ने की कांग्रेस की तैयारी घोषित की, जीत का विश्वास जताया। उन्होंने बीजेपी की आलोचना की और अजित पवार की दुर्घटना जांच पर चिंता व्यक्त की, कर्नाटक में प्रयासों का खुलासा किया। सपकाल ने कांग्रेस की संगठनात्मक शक्ति और बारामती के विकास के प्रति प्रतिबद्धता पर प्रकाश डाला, बीजेपी पर विभाजनकारी राजनीति का आरोप लगाया।

Web Title : Congress Will Contest 2029 Baramati Election and Win: Harshvardhan Sapkal

Web Summary : Harshvardhan Sapkal declared Congress's readiness to contest the 2029 Baramati election, confident of victory. He criticized BJP and addressed concerns over Ajit Pawar's accident investigation, revealing efforts in Karnataka. Sapkal highlighted Congress's organizational strength and commitment to Baramati's development, accusing BJP of divisive politics.