काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढण्याचा आग्रह सोडावा; रामदास आठवले यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 20:44 IST2026-04-04T20:43:14+5:302026-04-04T20:44:02+5:30
अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपल्या पक्षाची अजूनही अपेक्षा आहे.

काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढण्याचा आग्रह सोडावा; रामदास आठवले यांचे आवाहन
पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपल्या पक्षाची अजूनही अपेक्षा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही निवडणूक लढण्याचा आग्रह सोडावा व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी त्यांना तशा सूचना द्याव्या असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आठवले यांनी यावेळी केले. तसेच जर निवडणूक झालीच तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या कार्यकारणी बैठक शनिवारी दूपारी पुण्यात झाली. त्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, आरपीआयचे महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, प्रदेश सरचिटणीस अविनाश महातेकर,गौतम सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम,राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई लांडगे, शहर अध्यक्ष संजय सोनवणे, बाळसाहेब जानराव, नगरसेवक निलेश आल्हाट इ. उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने चवदार तळे आंदोलन शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या स्वरूपाबद्दल चर्चा करण्यात आली. या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. महाड येथील सत्याग्रह या घटनेचे शताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने समता परिवर्तन यात्रा १४ ऑक्टोबरला सातारा येथून ही यात्रा सुरू करून त्याचा समारोप पुण्यात होईल. वेगवेगळे जिल्हे, तालुक्यांच्या ठिकाणी यात्रा जाणार आहे, असे आठवले यांनी सांगितले. यावेळी रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी व प्रमुख नेत्यांची बैठक येथे पार पडली.
अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला पाठिंबा
अनुसूचित जाती उपवर्गीकरण आरक्षणाची चर्चा जोरदार सुरू असून लवकरच लागू होण्याची शयक्ता आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना वेगळे आरक्षण असणार आहे. त्याअनुशंगानी या विषयावर चर्चा करण्यासाठी (दि.१६) तारखेपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर चर्चा होणार असून या उपवर्गीकरणाला पाठिंबा असल्याचे ही आठवले यांनी यावेळी सांगितले. तसेच अनुसूचित जाती, जमातींप्रमाणेच इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त यांना देखील राजकीय आरक्षण मिळावे, अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. नेत्यांनी काहीतरी पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने अशा भोंदू बाबांच्या नादी लागू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व महत्त्वाच्या बैठकांना आरपीआयच्या उपमहापौरांना आमंत्रित करावे भाजपा कडून महापालिका निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद मिळाले मात्र त्यानंतर उपमहापौरांना योग्य सन्मान मिळत नसल्याची चर्चा आहे. ही चर्चा अयोग्य आहे. मात्र, रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घ्यावे. सर्व महत्त्वाच्या बैठकांना उपमहापौरांना आमंत्रित केले जावे असे ही नमुद केले.