Congress needs to leave the politics of coalition and work together: Dr Shripal Sabnis | काँँग्रेसने गटातटाचे राजकारण सोडून एकत्रितपणे काम करण्याची गरज : डॉ. श्रीपाल सबनीस
काँँग्रेसने गटातटाचे राजकारण सोडून एकत्रितपणे काम करण्याची गरज : डॉ. श्रीपाल सबनीस

ठळक मुद्देआधुनिक भारताच्या जडणघडणीत राजीव गांधी यांचे मोलाचे योगदान

पुणे : सध्या कॉंग्रेस उपेक्षित अवस्थेत आहे. नरेंद मोदी- अमित शहा या जोडगोळीपुढे काँग्रेस गलितगात्र झाल्याचे दिसत आहे. त्याचे कारण विचारांशी एकनिष्ठ कार्यकर्त्यांची वानवा आहे. धर्मनिरपेक्ष विचारांचे लोक म्हणजे कॉंंग्रेस आहे. आज देश एकाधिकारशाहीकडे जात असताना राजीव गांधी यांचे सर्वसमावेशक विचार पसरविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
पुणे नवरात्रौ महोत्सव आयोजित  स्व. राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ तिवारी यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, पीएमटीचे माजी अध्यक्ष भीमराव पाटोळे,शारदा तिवारी, संयोजक आबा बागुल, सदानंद शेट्टी यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले,माहिती तंत्रज्ञान, भ्रष्टाचार निर्मूलन, संरक्षण दलातील आधुनिकता, तरुणांना मतदानाची संधी असे अनेक दूरदृष्टी ठेवून स्व.पंतप्रधान राजीव गांधी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भारत प्रगतीपथावर आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत राजीव गांधी यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. मात्र, त्यांचे योगदान आणि बलिदान आपण विसरत चाललो आहोत, ही दुर्दैवी बाब आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा काँग्रेसचा विचार आणि राजीव गांधी यांची दूरदृष्टी चिरंतर ठेवायची असेल, तर काँग्रेस पक्षाने गटातटाचे राजकारण सोडून एकत्रितपणे काम केले पाहिजे. 
बाळासाहेब शिवरकर म्हणाले, राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीने आज आयटी पार्कमध्ये लाखो लोकांना रोजगार मिळाला. बोफोर्समुळेच कारगिल युद्ध जिंकले. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी त्यांनी डिजिटायझेशन सुरू केले. लोकशाही प्रक्रियेत तरुणांना सहभागी करुन घेतले. अनेक समाजहिताचे अनेक निर्णय घेणा-या राजीव गांधी यांच्या कायार्तून प्रेरणा घेत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.
गोपाळ तिवारी म्हणाले, काँग्रेस कार्यकर्ता सामाजिक बांधिलकी जपणारा असतो. ज्यांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करीत आहे, त्या आदरणीय राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार मिळाला, याचा आनंद आहे. 'सामर्थ्य आहे चळवळीचे' उक्तीप्रमाणे कॉंग्रेस विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी काम करत आहे. महात्मा गांधी आणि राजीव गांधी यांच्या विचारांची सांगड घालत युवक काँग्रेस, अखिल भारतीय कॉंग्रेस आणि पालिकेत चांगले काम करता आले. या प्रवासात कुटुंबीयांची साथ मिळाली.
रमेश बागवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आबा बागुल यांनी केले. मुख्तार शेख यांनी सूत्रसंचालन केले. सदानंद शेट्टी यांनी आभार मानले.


Web Title: Congress needs to leave the politics of coalition and work together: Dr Shripal Sabnis
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.