काँग्रेस नेते राजीव सातव यांना 'सायटोमेगँलो व्हायरस' या नव्या विषाणूची लागण ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 01:48 PM2021-05-15T13:48:26+5:302021-05-15T14:00:37+5:30

23 तारखेपासून सुरू आहेत पुण्यात उपचार

Congress leader Rajiv Satav's health deteriorated again, Balasaheb Thorat informed that he is undergoing treatment | काँग्रेस नेते राजीव सातव यांना 'सायटोमेगँलो व्हायरस' या नव्या विषाणूची लागण ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

काँग्रेस नेते राजीव सातव यांना 'सायटोमेगँलो व्हायरस' या नव्या विषाणूची लागण ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Next

पुणे: काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीत शुक्रवारी रात्री अचानक खालावली. डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाबाधित झाल्याने सातव जहांगीर रूग्णालयात दाखल आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात देखील केली होती. मात्र सातव यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. 

गेल्या १५ दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगिर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औषधांंना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे चांगली सुधारणा होत होती. ते आता धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते असे असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. 

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंनी शुक्रवारीच जहांगीरमध्ये येत त्यांची विचारपूस केली होती. रात्री तब्येत बिघडल्याचे समजल्यावर त्यांनी पुण्यातच मुक्काम केला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज जहांगीरमध्ये जाऊन सातव यांच्या तब्येतीची माहिती घेतली. लोकमत बरोबर बोलताना थोरात यांनी सातव यांचा प्रकृती स्थिर आहे. ते औषधांना प्रतिसाद देत आहेत असे सांगितले व ते लवकर बरे होतील असा विश्वास देखील व्यक्त केला. दरम्यान सातव यांच्या आई रजनी सातव आज सकाळीच हिंगोलीहून पुण्यात दाखल झाल्या आहेत. सातव यांचे हिंगोली, पुण्यातील बरेच निकटचे कार्यकर्तेही जहांगीरमध्ये आहेत. सर्वांचे चेहरे काळजीग्रस्त दिसत असून परमेश्वराने सातव यांना लवकर बरे करावे अशी प्रार्थना ते करत आहेत. 
---// 

काय आहे सायटोमेगँलो नवा विषाणू? 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीव सातव यांना 'सायटोमेगँलो व्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाली असल्याची माहिती दिली. या विषाणूबाबत विचारले असता राज्याचे माजी आरोग्य संचालक व कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की हा नवा नाही तर जुनाच विषाणू आहे. तोही संसर्गजन्य आहे. प्रौढांपेक्षा लहान मुलांसाठी तो धोकादायक आहे. यावरची परिणामकारक औषधे उपलब्ध आहेत. तो बराही होतो.

सातव यांना या विषाणूचा संसर्ग कोरोनाने त्यांच्या फुफ्फुसाची क्षमता आधीच कमी झाल्याने झाला असावा असा अंदाज व्यक्त करतानाच
याला को इन्फेक्शन म्हणतात असेही डॉ. साळुंखे म्हणाले. कोरोना व हा विषाणू यांचा काहीही परस्पर संबध नाही व कोरोना झाला की याचा संसर्ग होतो असेही नाही असे डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी रुग्णालयाशी संपर्क ठेवून..

खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रूग्णालयाशी संपर्क ठेवून असल्याची माहिती मिळाली. रूग्णालयाने सातव यांच्या प्रकृतीबाबत अधिकृतपणे काही जाहीर करणे अपेक्षित असताना ते टाळले जात आहेत. त्यामुळे उगीचच अनधिकृतपणे काहीही गोष्टी वाऱ्यावर बोलल्या जात आहेत.

Read in English

Web Title: Congress leader Rajiv Satav's health deteriorated again, Balasaheb Thorat informed that he is undergoing treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.