प्रियांका गांधी यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी पोलिसात तक्रार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 20:05 IST2019-02-04T20:00:31+5:302019-02-04T20:05:51+5:30
अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी पुणे शहर महिला काँग्रेसने दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रियांका गांधी यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी पोलिसात तक्रार !
पुणे : अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी पुणे शहर महिला काँग्रेसने दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेस सरचिटणीस पदी नुकत्याच विराजमान झालेल्या गांधी यांच्या नावाने योगी संजय नाथ आणि ज्योती तिवारी या दोन फेसबुक अकाउंटवर आक्षेपार्ह्य मजकूर असल्याचे पुणे शहर महिलाध्यक्षा सोनाली मारणे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बदनामी करून अब्रुनुकसानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
या विषयावर लोकमत'शी बोलताना मारणे म्हणाल्या की, 'राजकारण असलं तरी कोणत्याही महिलेवर इतक्या हीन पातळीवर जाऊन टीका करणे चुकीचे आहे. महिला कोणत्याही पक्षातली असली तरी व्यक्तिगत पातळीवर किंवा शारीरिक उदाहरणांचा अश्लील वापर करणाऱ्या प्रवृत्तींना काँग्रेस कधीही साथ देणार नाही. अशा पद्धतीने सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या बदनामीकारक अपप्रचाराला कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल.