पुणे: पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, मंगळवारी अस्थिरोग विभागातील विद्यार्थ्याचे रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत सर्वांनीच 'मौन' बाळगले असून, माध्यमांपर्यंत माहिती पोहोचू नये याची पुरेपूर दक्षता रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणी काही विद्यार्थी निलंबित झाल्याची देखील माहिती आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमून त्यांच्या अहवालानंतर अजून काही विद्यार्थ्यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे. गेल्याच वर्षी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना टार्गेट करून रॅगिंगची गंभीर घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा यंदा हा प्रकार समोर आला. त्यानंतर बी जे महाविद्यालयाचे डीन डॉ एकनाथ पवार यांनी काहीतरी बोलणे, मोठ्याने बोलणे, ओरडणे, शिवीगाळ याबाबत रॅगिंगची तक्रार असल्याचे सांगत आताच मला त्याच्या बाबतीत भाष्य करता येणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ पवार म्हणाले, काल रात्री पर्यंत चौकशी सुरू होती. अँटी रॅगिंग कमिटी स्थापन केलेली आहे. १५ ते २० जण या समिती मध्ये आहेत. तीन विद्यार्थ्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले. अँटी रॅगिंग कायद्या मध्ये काही तरतुदी आहेत. ज्या प्रकारे रॅगिंग केली आहे. सबळ पुरावे आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल. सोमवारी तक्रार प्राप्त झाली आणि त्यानंतर चौकशी करण्यात आली. तक्रारदार यांनी ८,१० दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. पण कुठली ही तारीख झालेली नाही. एका विद्यार्थ्याच्या आईने ही तक्रार केली आहे. तक्रार पूर्णपणे आम्ही शहानिशा करतोय. काहीतरी बोलणे, मोठ्याने बोलणे, ओरडणे, शिवीगाळ याबाबत रॅगिंगची तक्रार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बी. जे. शासकीय महाविद्यालयाला रँगिंगचा इतिहास आहे. यापूर्वी देखील काही प्रकरणे समोर आली आहेत. मात्र, त्यातून ससून प्रशासनाच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही. हे प्रकार थांबवावेत आणि रॅंगिग होऊ नये, यासाठी प्रशासन कोणतीच पावले उचलताना दिसत नाही. केवळ चौकशी करणार, असे सांगितले जाते. त्याचा अहवाल सादर केला जातो. मात्र, त्या चौकशीचे पुढे काय होतं?, याची कोणतीही माहिती समोर येत नाही. रँगिंगचे प्रकार होत असताना प्रशासन काय झोपा काढते का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. २०२४ मध्येही बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांना टार्गेट करून रॅगिंगची घटना समोर आली होती. वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून छळ होत असल्याच्या तक्रारी दोन्ही विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यातून दोन विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. तरीही असे प्रकार वारंवार होत आहेत. उद्या वरिष्ठांच्या छळाला कंटाळून एखाद्या विद्यार्थ्याने जीवाचे काही बरे वाईट केले तर दोष कुणाचा? महाविद्यालयात अँटी रॅगिंग समितीदेखील कार्यान्वित आहे, पण ती नेमके करते काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.