Pune Crime: पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा जागा हडपण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 15:06 IST2021-12-20T15:01:07+5:302021-12-20T15:06:25+5:30
आरोपींनी संगनमत करून कट रचून फिर्यादी यांनी सोपवलेल्या मालमत्तेची अप्रमाणिकपणे केली अफरातफर

Pune Crime: पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा जागा हडपण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
पिंपरी : कागदपत्रांमध्ये खोटा रस्ता दाखवून बांधकामाचा आराखडा मंजूर केला. तसेच जागा हडपण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम व्यवसायिकासह पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बावधन येथे फेब्रुवारी २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
राजेंद्र बाळनाथ भुंडे (वय ४६, रा. कोथरूड, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एस. आर. ए. प्रमोटर्स अॅण्ड डेव्हप्लर्स लि. यांचे भागीदार शामकांत जगन्नाथ शेंडे, मुकेश मनोहर येवले, सुनील पोपटलाल नहार, सचिन पोपटलाल नहार वास्तु विद्या विशारदमधील श्रीमती सीमा गोहाड यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून कट रचून फिर्यादी यांनी सोपवलेल्या मालमत्तेची अप्रमाणिकपणे अफरातफर केली. फिर्यादी यांना खोटी प्रलोभने दाखवून फिर्यादी यांना त्यांच्या मालकीची जमीन देण्यास भाग पाडले. फिर्यादी यांचा विश्वासघात करून बनावट आराखडा बनवून फिर्यादी यांची ठकवणूक केली. तसेच आरोपी (बांधकामकर्ता) याने खोटे नाव दाखवत तसेच फिर्यादी यांचा ७/१२ (किंमती प्रतिभूती) च्या संदर्भात २०१९ च्या मंजूर आराखड्यातून खोटे दस्त दाखवले. त्यातून फिर्यादी यांची जमीन हडपण्याचा डाव रचला.
दरम्यान फिर्यादी राजेंद्र भुंडे यांनी याप्रकरणी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.