कंपनीतील वाहनचालकाने ६५ लाखांचा कच्चा माल चोरला; स्वतःच पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 19:36 IST2021-06-27T19:36:33+5:302021-06-27T19:36:39+5:30
नऱ्हे येथील घटना; कंपनीत गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या वाहनचालकास अटक

कंपनीतील वाहनचालकाने ६५ लाखांचा कच्चा माल चोरला; स्वतःच पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेला
धायरी: नऱ्हे परिसरात असणाऱ्या एका कंपनीतील ६५ लाख ५२ हजार १०० रुपये किंमतीचा कच्चा माल चोरीला गेला असून याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी एकास अटक केली. शरद विठ्ठल दारवटकर (वय:३० वर्षे, रा. मानाजी नगर, नऱ्हे, पुणे) असे याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला कंपनीत चोरी झाल्याचे कळाल्यावर फिर्याद दाखल करण्यासाठी गेलेल्या ऋषिकेश रवींद्र कापरे यांच्यासोबत तोही पोलीस ठाण्यात गेल्याचे समोर आले आहे.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे येथील पारी कंपनी परिसरात ललवाणी मेटॅलिक्स प्रा. ली कंपनी आहे. या कंपनीमध्ये फेरोममोली, निकेल, अल्युमिनियम नोच बार व निकेल मॅग्नेशियम ठेवला होता. २२ जून सायंकाळी ६ वाजता ते २३ जूनच्या पहाटे सात वाजेच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून एकूण ६५ लाख ५२ हजार १०० रुपयांचा कच्चा माल चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाबाबत सूचना दिल्या.
दरम्यान वाहनचालकानेच चोरी केल्याचे आले समोर
शरद दारवटकर हा या कंपनीत गेल्या सहा वर्षांपासून काम करत होता. कंपनीत चोरी झाल्याचे समजल्यावर कापरे यांच्या बरोबर तोही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला होता. मात्र सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी तांत्रिक व सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करून दारवटकर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची चौकशी केली असता चोरी केल्याचे कबूल केले. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.