आयुक्तसाहेब, पुण्यात हे काय चाललंय? ‘कोयता गँग’ची दहशत थांबायचं नाव घेतच नाही; कुठे तोडफोड तर कुठे लूटमार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:11 IST2025-11-28T15:11:38+5:302025-11-28T15:11:38+5:30
गावगुंडांच्या निशाण्यवर सर्वसामान्य नागरिक असून त्यांना धडा शिकवावा आणि सर्वसामान्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे, यासाठी उपाययोजना कराव्यात अशी भावना पुणेकरांची आहे.

आयुक्तसाहेब, पुण्यात हे काय चाललंय? ‘कोयता गँग’ची दहशत थांबायचं नाव घेतच नाही; कुठे तोडफोड तर कुठे लूटमार...
पुणे : सुसंस्कृत पुणे शहरात ‘कोयता गँग’ची दहशत थांबायचं नाव घेतच नाहीये. कुठे रस्त्यावर उभी वाहनं फोडली जात आहेत. तर कुठे लूटमार केली जात आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातील विमाननगर परिसरात घडला आहे.
२६ तारखेला विमाननगरमध्ये कोयता गँगच्या पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं एका पान टपरीवाल्यावर हल्ला करत धुमाकूळ घातला. या टोळक्याला सुरुवातीला सिगारेट दे, विमल दे असं म्हणत दुकानात असणाऱ्या व्यक्तीला धमकावलं. या गुंडांचा उन्नत पाहून दुकानदार त्यांना पाहिजे त्या वस्तू देतही होता. सिगारेट, विमल आणि पाहिजे ते घेतल्यानंतरही या गुंडांचं समाधान झालं नाही. त्यानंतर टोळक्यातील एकाने शर्टात लपवलेला कोयता बाहेर काढला. आणि क्षणात दुकान फोडायला सुरुवात केली. दिसेल त्या वस्तूंवर शटर, काउंटर, दुकानातील वस्तू यावर त्याने कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. या टोळक्याचा हा उन्माद पाहून परिसरात उपस्थित नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला. आणि त्यानंतर हे गावगुंड पळून गेले. संबंधित दुकानदार यातून सावरत असतानाच हातात कोयता घेतलेला तो गुंड पुन्हा आला. पुन्हा कोयत्याचा धाक दाखवला. आणि पुन्हा त्याला पाहिजे त्या वस्तू घेऊन निघून गेला. हे सर्व वर्दळीच्या घडत होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोयता गॅंगच्या दहशतीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
दुसऱ्या एका घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. फुरसुंगीतील आदर्श नगरमधील टिपू सुलतान चौकात आणखी एका कोयता गँगने धुमाकूळ घातला होता. हातात कोयते, दगड घेऊन या गावगुंडांच्या टोळक्याने 20 ते 25 वाहनांची तोडफोड केली. एक-दोन नाही तर वीस ते पंचवीस वाहनं याठिकाणी फोडली आहेत. समोर दिसेल त्या कार, रिक्षा,दुचाकी सगळ्यावर हल्ला केला. गावगुंडांच्या दहशतीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाला आहे. हातात कोयते असल्यानं कुणीही या गावगुंडांना थांबवण्याची हिंमत केली नाही. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड झाल्याने पुणे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली.
कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागल्याने पोलिसांनी फुरसुंगीतील आरोपींचा शोध घेतला. तर यातील बहुतांश आरोपी अल्पवयीन निघाले. यातील सज्ञान आरोपी फऱ्या उर्फ फरहान साहेबलाल शेख याला अटक केली. इतकच नाही तर ज्या ठिकाणी या गुंडांनी तोडफोड केली होती. त्याच ठिकाणी यांना नागरिकांच्या समोर फटकावलं. आणि पुन्हा असं करणार नाही हे बघून घेतलं. मात्र गुन्हा घडल्यानंतरच पोलीस जागे होणार आणि गावगुंडांना धडा शिकवणार हा प्रकार आणखी किती दिवस चालणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील काही महिन्यात पुणे पोलिसांनी कुख्यात गुंडांच्या टोळ्यांना धडा शिकवला. आंदेकर गॅंग, मारणे गॅंग, घायवळ गॅंग, टिपू पठाण या गॅंगच्या गुंडांवर मोका कायद्यानुसार कारवाई केली. या टोळ्यातील बहुतांश गुंड आता वेगवेगळ्या तुरुंगात आहेत. त्यामुळे गुंडांच्या टोळ्यांची भीती कमी झाली असं वाटत असतानाच हातात कोयता घेतलेले हे गावगुंड दहशत पसरवू लागले आहेत. आणि त्यांच्या निशाण्यवर सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी नामचीन गुंडांना जसा धडा शिकवला तसाच धडा या गावगुंडांनाही शिकवावा आणि सर्वसामान्य नागरिकांनाही सुरक्षित वाटलं पाहिजे. यासाठी उपाययोजना कराव्यात अशी भावना सर्वसामान्य पुणेकरांची आहे.