CNG Rate: सीएनजीचा दर शंभरी गाठण्याच्या मार्गावर; पुन्हा एकदा चार रुपयांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 09:17 IST2022-10-03T09:17:22+5:302022-10-03T09:17:30+5:30
पुण्यात १ एप्रिल २०२२ रोजी ‘सीएनजी’चा दर ६२.२० रुपये होता

CNG Rate: सीएनजीचा दर शंभरी गाठण्याच्या मार्गावर; पुन्हा एकदा चार रुपयांनी वाढ
पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा प्रतिकिलो ४ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात आता सीएनजीचा दर किलोमागे ८७ रुपयांवरून ९१ रुपये झाला आहे. डोमेस्टिक पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी)च्या किमतीत तीन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे त्याचा दर आता ४९.५० रुपयांवरून ५२.५० रुपये झाला आहे. ही दरवाढ रविवारी मध्यरात्रीपासून केली आहे.
नॅचरल गॅसचा जाणवणारा तुटवडा, वाढलेला वापर आणि नैसर्गिक वायूच्या इनपूट खर्चात वाढ झाली आहे. नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेची कमतरता भरून काढण्यासाठी री गॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅसदेखील मिसळणे आवश्यक आहे. त्यामुळे एमएनजीएलद्वारे खरेदी केल्या जाणाऱ्या गॅसच्या इनपूट खर्चात लक्षणीय वाढ झाल्याने ही वाढ करावी लागत असल्याचे कंपनीने कळविले आहे.
पुण्यात १ एप्रिल २०२२ रोजी ‘सीएनजी’चा दर ६२.२० रुपये होता. त्यात सातत्याने वाढ होऊन ४ ऑगस्ट रोजी ९१ रुपये झाला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात १७ ऑगस्टला सीएनजीच्या दरात चार रुपयांनी कपात केली होती. रविवारी पुन्हा चार रुपयांची वाढ केल्याने आता हा दर ९१ रुपयांवर पोहोचला आहे.