VIDEO: "महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर बघा"; हातात एके-४७ घेऊन अजितदादांची मिश्किल प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:40 IST2025-02-06T18:30:40+5:302025-02-06T18:40:56+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अत्याधुनिक संरक्षण उत्पादनाच्या संकुलाला भेट दिली.

VIDEO: "महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर बघा"; हातात एके-४७ घेऊन अजितदादांची मिश्किल प्रतिक्रिया
DCM Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मिश्किल शैलीसाठी नेहमीच ओळखले जातात. अनेकवेळा केलेल्या रोखठोक वक्तव्यांमुळे अजित पवार हे अडचणीत सुद्धा आले आहे. मात्र त्यांच्या अशा भाषणांमुळे अनेकदा ते चर्चेचा विषय ठरतात. अशातच पुण्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हातात एके-४७ रायफल घेऊन अनेकांवर निशाणा साधला आहे. यावेळी अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे मिश्किलपणे आमच्या बातम्या नीट द्या नाहीतर उडवून टाका असा इशाराच पत्रकारांना दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एके-४७ रायफल हातात घेत निशाणा साधला. यावेळी दोघांनीही समोर असलेल्या लोकांवर नेम साधला होता. त्यानंतर अजित पवार यांनी थेट पत्रकार आणि माध्यमांच्या कॅमेरांवर बंदूक रोखत मिश्किलपणे महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या नाहीतर उडवून टाकू असं म्हटलं. अजित पवार यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू अनावर झालं.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी हातात एके-४७ रायफल घेताच समोरच्या लोकांवर फिरवायची अॅक्टिंग केली. त्यानंतर आम्ही दोघं तर सगळ्यांना उडवून टाकू असं म्हटलं. त्यानंतर पत्रकारांवर रायफल रोखत, महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर बघा, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली.
#WATCH | महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उपमुख्यमंत्री अजीत पवार ने महाराष्ट्र के पुणे में निबे इंडस्ट्रीज लिमिटेड में अत्याधुनिक रक्षा विनिर्माण परिसर का उद्घाटन किया। pic.twitter.com/cA1Bu2MN5X
— ANI_HindiNews (@AHindinews) February 6, 2025
चाकण येथील औद्योगिक वसाहतीमधील निबे लिमिटेड मिसाईल्स कॉम्प्लेक्स अँड प्रिसिजन मशीनिंगच्या अत्याधुनिक मिसाईल्स अँड स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्सचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केले.
"पोलिसांना उचलायला लावेल"; अजितदादांनी दिला दम
गुरुवारी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांलयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध मान्यवरांचा सन्मान केला जात होता. त्यावेळी तिथल्या काही तरुणांनी शिट्ट्या वाजवल्या. त्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले. माईक हातात घेत हा कार्यक्रम पोलिसांचा आहे काय चालले आहे. शिट्ट्या कशाला वाजवता, शिट्ट्या वाजऊ नका, मुख्यमंत्री येथे आले आहेत. शिस्त आहे की नाही? आता शिट्ट्या वाजविल्या तर पोलिसांना उचलायला सांगेन, असा इशारा अजित पवार यांनी दिला.