Video: उरुळी कांचन जवळच्या गावात ढगफुटी; शेतकऱ्यांची पिके झाली मातीमोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 14:34 IST2020-10-19T12:36:37+5:302020-10-19T14:34:17+5:30
हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील शेवटच्या टोकातील भागात व पुरंदर तालुक्याच्या उत्तर भागातील ही गावे ढगफुटीच्या तडाख्यात सापडली आहे.

Video: उरुळी कांचन जवळच्या गावात ढगफुटी; शेतकऱ्यांची पिके झाली मातीमोल!
उरुळी कांचन : उरुळी कांचन जवळच्या वळती,शिंदवणे रेल्वे स्टेशन व वाघापूर गावात रविवारी सायंकाळी ढगफुटीने सुमारे तीनशे साडे तीनशे हेक्टर शेत जमिनीचे प्रचंड नुकसान झाले. तसेच वळती गावाच्या घाट माथ्यावर डोंगराच्या बाजूला असलेले चार नाले फुटल्यामुळे गावात सर्वत्र पाणी शिरले. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधी कोरोनाने व आता परतीच्या पावसाने बळीराजाचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.
हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील शेवटच्या टोकातील भागात व पुरंदर तालुक्याच्या उत्तर भागातील ही गावे ढगफुटीच्या तडाख्यात सापडली आहे. या नुकसानीची भरपाई सरकारने तातडीने पंचनामे करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.या ढगफुटीने उरुळी कांचन ते जेजुरी व सासवडकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. या पाण्यात शेतकऱ्यांच्या पाईप लाईन व विहिरीवरील विद्युत पंप , रस्ते वाहून गेले आहेत.
उरुळी कांचन पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी आपल्या सहकाऱ्यांसह घटना स्थळी पोहोचले असून अद्याप नुकसानीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कोणत्याही अधिकाऱ्याशी संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे नुकसानीचा आकडा काळाला नाही. या ढगफुटीने ओढ्यांमधून वाहून येणारे पाणी उरळी कांचन मार्गे भवरापुरला मुळामुठा नदीला मिळते. त्यामुळे उरळीकांचन गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
.......................
नागरिकांना सतर्कतेचा इशारा....
वळती भागात डोंगरात ढगफुटी झाल्याने वरील 04 बाजूचे बंधारे फुटले असून वळतीतील मुख्य बंधारा पाणी जास्त होऊन फुटू नये याकरिता चारी काढली आहे. उरुळी कांचन गावात ओढ्या नजीक असणारे रहिवाशी, दुकान विक्रेते यांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत.