Pune News | पुण्यात दीड लाखांची लाच घेताना न्यायालयातील लिपिक ACB च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 16:30 IST2022-12-03T16:29:37+5:302022-12-03T16:30:01+5:30
शिवाजीनगर न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली

Pune News | पुण्यात दीड लाखांची लाच घेताना न्यायालयातील लिपिक ACB च्या जाळ्यात
पुणे : शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेल्या खून तसेच माेक्काच्या खटल्यात आराेपीची निर्दाेष सुटका करण्यास मदत करताे, असे सांगितले. तसेच आराेपीच्या मावसभावाकडे दाेन लाखांची मागणी करून दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. शिवाजीनगर न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
सचिन अशाेक देठे (वय ३९, राजगुरूनगर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. त्याच्या विराेधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली हाेती.
सचिन देठे हा सत्र न्यायालयात वरिष्ठ लिपिक आहे. तक्रारदारच्या मावसभावाच्या विरोधात खून तसेच माेक्काअंतर्गत सत्र न्यायालयात खटला दाखल आहे. या खटल्यात साक्षीदारांचे जाबजबाब टायपिंग करताना आवश्यक ताे बदल करून त्या खटल्यातून मुक्तता व्हावी, यासाठी मदत करताे, असे देठे याने तक्रारदाराला सांगितले आणि त्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद आहे.
त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरुवारी, १ डिसेंबर राेजी रात्री न्यायालय परिसरात सापळा लावला. पडताळणीमध्ये देठे याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपये मागितले आणि तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच घेताच पथकाने देठेला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक ज्योती पाटील तपास करीत आहेत.